परसोडी रैयत येथे जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या आवारभिंतीचे भूमिपूजन
अर्जुनी-मोर.-तालुक्यातील परसोडी रैयत येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या आवारभिंत बांधकामाचे भूमिपूजन गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या हस्ते ता. १५ सप्टेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
शाळेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवारभिंत अत्यंत आवश्यक असून, या बांधकामामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित, शिस्तबद्ध व पोषक शैक्षणिक वातावरण उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. यावेळी उपस्थित ग्रामस्थ, पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधताना लायकराम भेंडारकर यांनी शाळांचा भौतिक विकास, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन केले.
“विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. शाळेच्या विकासासाठी भविष्यातही आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल,” असे आश्वासन भेंडारकर यांनी यावेळी दिले.
आवारभिंतीच्या बांधकामामुळे शाळेच्या परिसराला सुरक्षितता मिळण्यासोबतच शाळेची स्वच्छता, शिस्त आणि परिसराचे सौंदर्यही टिकवून ठेवण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या विकासकामाचे ग्रामस्थ व पालकांनी स्वागत केले.यावेळी सरपंच दयाराम लंजे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जागेश्वर कोरे, उपाध्यक्ष सुभाष कठाने, पोलीस पाटील यादोराव जेंगठे, बापुदास कावळे, दिंगबर मडावी, सुभाष चुटे, एकनाथ मेश्राम, मुख्याध्यापक वीरेंद्र भिवगडे यांच्यासह शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.





