24.4 C
Gondiā
Saturday, September 12, 2026
Home शैक्षणिक पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरतीत हिंदी माध्यमाच्या उमेदवारांवर अन्याय

पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरतीत हिंदी माध्यमाच्या उमेदवारांवर अन्याय

0
8

गोंदिया- पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत हिंदी माध्यमाच्या पात्र उमेदवारांवर कथितपणे अन्याय होत असल्याचा आरोप करत हिंदी माध्यमाच्या टीईटी पात्र उमेदवारांनी केला आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी उमेदवारांनी निवेदनातून केली आहे.
काही उमेदवारांनी इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी अथवा अन्य माध्यमातून घेतले असले तरी त्यांनी डीएड/बीएड अभ्यासक्रम हिंदी माध्यमातून पूर्ण केला आहे. अशा उमेदवारांच्या हिंदी माध्यमातील शिक्षक पदासाठीच्या पात्रतेची फेरतपासणी करून त्यांना संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गोंदिया, नागपूर, पुणे, जळगाव, वर्धा, नाशिक, नवी मुंबई तसेच मुंबई महानगरपालिका क्षेत्रासह हिंदी भाषिक विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असलेल्या भागांमध्ये हिंदी माध्यमाच्या शिक्षकांची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. हिंदी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त राहिल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपालिका प्रशासनाने हिंदी माध्यमातील सर्व रिक्त पदांची माहिती तातडीने जाहीर करून उपलब्ध पदांवर १०० टक्के भरती करावी, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.
आगामी टीईटी-४ परीक्षेत हिंदी भाषेचा समावेश करण्यात यावा, अशीही प्रमुख मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात हिंदी माध्यमाच्या शाळा व विद्यार्थी असल्याने हिंदी माध्यमाच्या उमेदवारांना त्यांच्या भाषेत परीक्षा देण्याची समान संधी मिळणे आवश्यक असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी माध्यमनिहाय पात्रता व नियम स्पष्टपणे पोर्टलवर प्रसिद्ध करावेत, तसेच उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेची निष्पक्ष फेरतपासणी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

शासनाने दखल घ्यावी
पात्र असूनही एकाही उमेदवारावर अन्याय होऊ नये. हिंदी माध्यमातील विद्यार्थ्यांनाही इतर माध्यमांप्रमाणे गुणवत्तापूर्ण शिक्षण व समान संधी मिळावी, अशी भूमिका हिंदी माध्यमाच्या टीईटी पात्र उमेदवारांनी मांडली आहे. शासनाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन हिंदी माध्यमातील रिक्त पदांची माहिती जाहीर करावी, पात्र उमेदवारांची फेरतपासणी करावी आणि शिक्षक भरती प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून उमेदवारांना न्याय देण्याची मागणी केली आहे