26.1 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home विदर्भ १०४९४५ बालकांना देणार पोलिओ डोस

१०४९४५ बालकांना देणार पोलिओ डोस

0
30

२९ जानेवारी व २ एप्रिलला पोलिओ लसीकरण
गोंदिया,दि.१ : देशाची भावी पिढी असलेल्या पाच वर्षाच्या आंतील सर्व बालकांना पोलिओ लसीकरण करावे. जिल्ह्यातील कोणताही या वयोगटातील बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची सर्व यंत्रणांनी काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात २८ डिसेंबर रोजी या मोहिमेच्या निमित्ताने आयोजित जिल्हा समन्वय समितीची सभा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, कुष्ठरोग विभागाचे सहायक संचालक डॉ.पराडकर यांची याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थिती होती.
२९ जानेवारी व २ एप्रिल २०१७ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील ० ते ५ वयोगटातील १ लाख ४ हजार ९४५ बालकांना पोलिओचा डोज देण्याचे निश्चित केले आहे. यामध्ये ग्रामीण भागातील ८६ हजार २०३ आणि शहरी भागातील १८ हजार ७४२ बालकांचा समावेश आहे. वरील दिवशी बुथवरील लसीकरणानंतर ग्रामीण भागात तीन दिवस आणि शहरी भागात पाच दिवस गृहभेटीतून लसीकरणातून सुटलेल्या बालकांना पोलिओ डोज पाजण्यात येणार आहे.
स्थलांतरीत व प्रवास करणारे बालकेही लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी बसस्थानके, रेल्वेस्टेशन, टोलनाके व विमानतळ परिसरात या बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात २९० पथके यासाठी काम करणार आहे.सन १९९४-९५ पासून राज्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत पाच वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओची लस देण्यात येते. ही मोहिम यशस्वीपणे राबविण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणा दक्षतापूर्वक काम करीत आहे.राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या जिल्हा समन्वय समितीच्या सभेला सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी, सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती. सभेचे संचालन व उपस्थितांचे आभार डॉ.सी.डब्ल्यू.वंजारे यांनी मानले.