28 C
Gondiā
Thursday, July 16, 2026
Home महाराष्ट्र महावितरण अंतर्गत होणारी कामे गुणवत्तापूर्ण आणि गतीने व्हावीत संजीव कुमार

महावितरण अंतर्गत होणारी कामे गुणवत्तापूर्ण आणि गतीने व्हावीत संजीव कुमार

0
27

मुंबई,दि.14-महावितरणची राज्यातील पायाभूत आराखड्यांतर्गत होणारी कामे गुणवत्तापूर्ण व गतीने व्हावीत यासाठी प्रकाशगड मुख्यालयात संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत या कामांचा दर्जा चांगला राखावा असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी दिले. तसेच या कामाच्या गुणवत्तेसाठी त्रयस्थ संस्थेची नियुक्ती करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
केंद्र सरकारच्या अर्थसहाय्यातून राज्यात महावितरणच्यावतीने दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना व एकात्मिक ऊर्जा विकास योजनेतील कामे केली जात आहेत. या कामांना गती देण्यासाठी तसेच कामांची गुणवत्ता कायम राखण्याबाबत या बैठकीचे आयोजन करण्यात आले. क्षेत्रीय कार्यालयातील सबंधित मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता यांनी परिमंडलस्तरावर बैठकीचे आयोजन करून वेळोवेळी कामाच्या प्रगतीचा आढावा घ्यावा व कामाची गुणवत्ता कायम राखावी, यासाठी मार्गदर्शनपर कार्यशाळेचेही आयोजन करावे असे निर्देश श्री. संजीव कुमार यांनी दिले.

उपकेंद्रासाठी लागणारी जागा, रोहित्रांचे ठिकाण, विविध विभागांच्या परवानग्या अशी विविध कामे यापुर्वीच पूर्ण करण्यात आल्यामुळे योजनेतील कामे नियोजत वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल, असेही संजीव कुमार यांनी सांगितले.या बैठकीस संचालक (प्रकल्प),दिनेशचंद्र साबू, प्रभारी कार्यकारी संचालक शिवाजी चाफेकरंडे यांच्यासही पायाभूत आराखडा विभागातील अधीक्षक अभियंते, संबंधित अधिकारी व कंत्राटदार उपस्थित होते.