दुर्गाबाईडोह कुंभली येथे आजपासून यात्रेला प्रारंभ

0
16

साकोली दि. १४: तालुक्यातील कुंभली येथील श्री क्षेत्र दुर्गाबाईडोह येथे आजपासून भव्य यात्रेला प्रारंभ होत असून प्रशासनाची पूर्व तयारी झालेली आहे. या यात्रेत अनेक श्रद्धास्थान भाविक दुर्गाबाई देवीचे व त्यांच्या सात भावांचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या भक्तीभावाने येतात. यामध्ये जिल्ह्यासह गोंदिया, नागपूर, अकोला, अमरावती, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर अशा अनेक जिल्ह्यातील भाविक येत असतात. श्रद्धेने डोहात स्रान करतात. पहाटेपासूनच पवित्र स्रानाला सुरूवात होते. गावात पाहुण्यांची रेलचेल असते.

या यात्रेत कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन ुसज्ज आहे. तसेच भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून पिण्याच्या पाण्याची, आरोग्य सेवा आदी सेवा प्रशासनातर्फे भाविकांसाठी केल्या आहेत. मकरसंक्रांतीच्या शुभ पर्वावर भरणारी यात्रा पाच दिवस भरते. या यात्रेत पारंपारिक हस्तकलेने तयार केलेल्या गृहोपयोगी साहित्याची दरवर्षी लाखो रूपयांची उलाढाल होते. पूर्वीपासून ही यात्रा घोड्यांच्या विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. परंतु कालांतराने घोडाबाजार मंदावला. फक्त दोन ते चार घोड्यांचे दर्शन होते.

या यात्रेत अनेक प्रकारची दुकाने थाटली असून लाखो रूपयांची उलाढाल होते. हॉटेल्स, कपड्यांची दुकाने, चपलांची दुकाने, सौंदर्य प्रसाधने, खेळणे, झुले, लोखंडी अवजारे, लोकरीची दुकाने, दगडी पाट्यांची दुकाने, प्रदर्शनी तसेच विशेष आकर्षण असलेले ब्रेक डान्स झुला व मौत का कुवा या सर्व प्रकारामुळे यात्रा फुलून जाते. यात्रेकरिता प्रवाशांची जाण्या-येण्याची पद्धतशीर सोय व्हावी म्हणून एस.टी. महामंडळातर्फे ज्यादा बसेसची व्यवस्था केलेली असते.

या डोहावर निम्न चुलबंद प्रकल्प तयार झाला असून प्रकल्पाची सर्व दारे बंद करून पाणी अडविले असल्यामुळे डोहातील पाण्याची पातळी खोलवर गेली असून भरपूर पाणी साचले आहे. त्यामुळे डोहाच्या चारही बाजूला बॅरिगेटस तयार केले असून डोहाच्या बाजूने आंघोळीकरिता बंदी घालण्यात आली आहे. यात्रेत निसर्गाचा सुंदर नजराना पहावयास मिळत असतो. यात्रेचे भव्य स्वरूप बघता पोलीस प्रशासन बारिक नजर ठेवून आहे. जिकडे तिकडे पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. भाविकांना शिस्तीने रांगेत दर्शन घेता यावे याकरिता पुरूषांकरिता व महिलांकरिता वेगवेगळी व्यवस्था केली आहे. अशाप्रकारे दुर्गाबाईचे मंदिर हे जागृत देवस्थान असून भाविक मोठ्या भक्तीभावाने येवून मकरसंक्रांतीच्या पर्वावर भरणाऱ्या यात्रेत दुर्गादेवीचे दर्शन घेवून आशिर्वाद घेतात.