28.1 C
Gondiā
Wednesday, July 15, 2026
Home महाराष्ट्र मुलांमधील असंसर्गिक रोगांच्या उपचारांसाठी एम्स नागपूर एक आदर्श प्रारूप विकसित करतेय:डॉ. प्रशांत...

मुलांमधील असंसर्गिक रोगांच्या उपचारांसाठी एम्स नागपूर एक आदर्श प्रारूप विकसित करतेय:डॉ. प्रशांत जोशी

0
8

नागपूर/गोंदिया,दि.१५ः– पश्चिम भारतातील मोठ्या भागातील मुले असंसर्गिक रोगांची (NCDs) शिकार होत आहेत, परंतु त्यांना अनेकदा दर्जेदार उपचार मिळत नाहीत. परिणामी, नागपूर येथील ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ (एम्स) बाधित मुलांसाठी उपचारांचे असे एक प्रारूप विकसित करत आहे, ज्याची अंमलबजावणी देशभरात केली जाऊ शकेल असे विचार एम्स नागपूरचे सीईओ डॉ. प्रशांत जोशी यांनी व्यक्त केले.ते एम्स नागपूर, युनिसेफ (UNICEF) इंडिया आणि प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पश्चिम विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने नर्सींग महाविद्यालय सभागृहात आयोजित (दि.१४ जुर्ले) कार्यशाळेत तज्ज्ञांनी मुलांमधील असंसर्गिक रोगांचे निदान, उपचार आणि व्यवस्थापन कसे करावे यांबाबत मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.

डाॅ.जोशी पुढे म्हणाले की,मुलांमधील असंसर्गिक रोगांचा कालावधी (incubation period) मोठा असतो आणि त्यांची सुरुवात अनेकदा बालपणातच होते; त्यामुळे या रोगांचे वेळीच निदान, निरंतर काळजी आणि एक सक्षम सार्वजनिक आरोग्य व्यवस्था असणे आवश्यक आहे. देशभरात अनुकरण करता येण्याजोगी आरोग्य-देखभाल प्रारूपे विकसित करण्यासाठी एम्स नागपूर कटिबद्ध आहे.कार्यशाळेदरम्यान, माध्यम प्रतिनिधींना बालपणीच्या असंसर्गजन्य आजारांचे निदान, उपचार आणि व्यवस्थापन कशा प्रकारे केले जाते, याची प्रत्यक्ष माहिती एनसीडीएस केंंद्र व संबधित आजाराशी लढत असलेल्या रुग्ण व नातेवाईंकाशी भेट करुन देत देण्यात आली. तसेच आरोग्यविषयक वृत्तांकन अधिक प्रभावी करण्यासाठीच्या सर्वोत्तम पद्धतींबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

तज्ज्ञांनी नमूद केले की, पश्चिम आणि मध्य भारतातील आदिवासी व ग्रामीण भागांत तपासणी आणि विशेष वैद्यकीय सेवांच्या मर्यादित सुविधांमुळे मुलांमधील असंसर्गिक रोगांची प्रकरणे अनेकदा उशिरा समोर येतात. दुसरीकडे, शहरी भागांत बैठी जीवनशैली, स्क्रीनचा अतिवापर आणि आहारातील बदलांमुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांचे प्रमाण वाढत आहे. ग्रामीण, आदिवासी किंवा शहरी अशा कोणत्याही भागात, आजाराची स्थिती गंभीर होईपर्यंत अनेकदा या रोगांचे निदान होत नाही.

याप्रसंगी बोलताना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या (पश्चिम विभाग) महासंचालक स्मिता वत्स शर्मा म्हणाल्या, “सार्वजनिक आरोग्याविषयीच्या बातम्यांमुळे जनजागृती होते आणि लोक कृतीशील होतात. पुराव्यांवर आधारित माहिती देणे आणि मुलांसमोरील आरोग्यविषयक नवीन आव्हाने नागरिकांना समजण्यास मदत करतील अशा बातम्या देणे ही पत्रकारांची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे.”