37.7 C
Gondiā
Saturday, June 27, 2026
Home महाराष्ट्र डोंबिवलीत साहित्य संमेलन आजपासून

डोंबिवलीत साहित्य संमेलन आजपासून

0
26

डोंबिवली,दि.3 : साहित्य सृजकांच्या वार्षिक सोहळ्यात राजकीय लुडबुड नको, असा अक्षय सूर उमटत असतानादेखील शुक्रवारपासून डोंबिवलीत भरणाऱ्या ९०व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या मांडवात राजकीय मांदियाळी जमणार आहे. संमेलनाच्या उद््घाटन समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तर समारोप सत्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हजेरी लावणार असल्याने या संमेलनाचा एकूण नूरच पालटून गेला आहे.

डोंबिवलीत प्रथमच साहित्य संमेलन होत असून, त्यासाठी पु. भा. भावे साहित्यनगरी सज्ज झाली आहे. शं. ना. नवरे यांच्या नावाने सजलेल्या मुख्य सभामंडपात शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता या संमेलनाचे उद्घाटन प्रख्यात हिंदी कवी विष्णू खरे यांच्या हस्ते होईल. मावळते संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी असहिष्णुतेचा मुद्दा मांडत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याने गतवेळी संमेलनाध्यक्षांचे भाषण चर्चेत आले होते. त्यामुळे नियोजित अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे हे स्वतंत्र विदर्भ किंवा मराठा आरक्षणाबाबत नेमकी काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. शिवाय, पुण्यात राम गणेश गडकरी यांचा पुतळा फोडल्याबद्दल संभाजी ब्रिगेडचा निषेध करावा, अशी मोहीम डोंबिवलीत सुरू झाल्याने संमेलनात त्याबाबतचा ठराव होणार का? याचीही उत्सुकता आहे.