24.3 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home विदर्भ पासधारकांसाठी मुभा असलेले डबे व गाड्या

पासधारकांसाठी मुभा असलेले डबे व गाड्या

0
24

berartimes.com
गोंदिया,दि.०२ मार्च : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मार्गावर गोंदिया ते नागपूर आणि नागपूर ते गोंदिया प्रवासादरम्यान मासिक पासधारक प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला जात आहे. याचा त्रास अप-डाऊन करणाऱ्या सर्व प्रवाशांना होत आहे. आरक्षित बोगींमध्ये या पासधारक प्रवाशांना सूट देण्याची मागणी जोर धरत आहे.
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाने गोंदिया ते नागपूर आणि नागपूर ते गोंदियापर्यंतच्या प्रवासासाठी मासिक पासधारकांसाठी तयार केलेले नियम असे आहेत. गाडी क्रमांक (११०४०) महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये गोंदिया ते नागपूर मार्गावर बोगी क्रमांक एस/२, एस/३, एस/४, एस/५, एस/६, एस/७ यात प्रवास करण्यात मुभा आहे.गाडी क्रमांक (१२८५६) नागपूर-बिलासपूर इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये नागपूर-बिलासपूर प्रवासात एस/६ व एस/७ या बोगींमध्ये व गाडी क्रमांक (११८५५) बिलासपूर-नागपूर इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये बिलासपूर-नागपूर प्रवासात एस/६ व एस/७ या बोगींमध्ये प्रवास करण्याची मूभा आहे.
याशिवाय अतिरिक्त मासिक तिकीटधारक खालील गाड्यांच्या जनरल व अनारक्षित बोगीत प्रवास करू शकतात. यात गाडी महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये गोंदिया-नागपूर-गोंदिया प्रवासात, विदर्भ एक्सप्रेसमध्ये गोंदिया-नागपूर-गोंदिया प्रवासात, अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये गोंदिया-नागपूर-गोंदिया, इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये बिलासपूर-नागपूर-बिलासपूर दरम्यान जनरल किंवा अनारक्षित बोगीत प्रवास करू शकतात.सदर गाड्यांमध्ये आरक्षित बोगीतून प्रवास करण्याची मूभा मासिक पासधारकांना देण्यात न आल्याने त्यांचा त्रास वाढला आहे. जनरल व अनारक्षित बोगीत गर्दी खूप असल्याने मासिक पासधारकांसाठी वेगळी बोगी किंवा आरक्षित बोगीतून प्रवास करण्याची मूभा द्यावी, अशी त्यांनी अनेक दिवसांपासूनची मागणी आहे.