गोंदिया: जिह्यातील चिचगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धासगड येथील धबधब्यात १५ ऑगस्ट रोजी दोन तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना दुपारी ३:३० ते ३:४५ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात बोपाबोडी (सौंदड), तालुका सडक अर्जुनी येथील रहिवासी कृष्णा लखन कापगते (२०) आणि हेतराम गुलाब सायाम (२५) हे दोघे पाण्यात बुडाले.घटना समजताच चिचगड पोलीस, महसूल विभाग, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन शोधकार्य सुरू केले. सर्च ऑपरेशनदरम्यान कृष्णा लखन कापगते याचा मृतदेह शोधण्यात यश आले, मात्र हेतराम गुलाब सायाम हा अद्यापही बेपत्ता आहे.
दिवसभर राबवलेल्या शोधमोहीमेनंतर अंधार पडल्याने बचावकार्य थांबवण्यात आले आहे. आता उद्या सकाळी ६ वाजेपासून पुन्हा शोधमोहीम सुरू केली जाणार आहे. बचाव पथकाकडून धबधब्याच्या पात्रात व आसपासच्या परिसरात बेपत्ता तरुणाचा शोध घेतला जाईल.या दुर्दैवी घटनेमुळे बोपाबोडीसह परिसरावर शोककळा पसरली आहे, तर बेपत्ता हेतरामच्या कुटुंबाची चिंता वाढली आहे. पोलीस आणि प्रशासनाचे पथक बेपत्ता तरुणाचा शोध घेत आहेत.




