भंडारा दि.09-: कृषी उत्पन्न बाजार समिती लाखनी येथे सन २०१२-१३ मध्ये नियमबाह्य पदभरती करण्यात आली आहे. याची तक्रार जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांचेकडे देऊनही अद्यापपर्यंत कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही, असा आरोप विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत डॉ. दिपराज इलमकार यांनी केला.
डॉ. इलमकार म्हणाले, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, भंडारा यांच्या अटी व शर्तीनुसार सन २०१२ -१३ मध्ये एकूण ८ जागा भरणे आवश्यक होते. समितीने जिल्हा सेवा योजना कार्यालय भंडारा, समाज कल्याण कार्यालय भंडारा, आदिवासी विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे ६ डिसेंबर २०११ ला पत्र पाठवून कर्मचारी भरती करण्यासाठी वय १८ ते ३० वयोगटाचे निरीक्षक व कनिष्ठ लिपीक या उमेदवारांची यादी सादर करण्यासाठभ पत्र पाठविले. परंतु पेपरमध्ये जाहिरात देताना खुल्या प्रवर्गासाठी वयमर्यादा १८ ते ३३ मागासवर्गीय प्रवर्गाकरीता वयमर्यादा १८ ते ३८ राहिले असे प्रसिद्ध करून शासनाची दिशाभूल केली. बाजार समिती कर्मचारी सेवा भरती नियम ९ अ प्रमाणे ही वयमर्यादा १८ ते ३० व मागासवर्गीय प्रवर्गाकरीता वय मर्यादा १८ ते ३० राहिल असे स्पष्ट नमुद आहे. बाजार समिती कर्मचारी सेवा भरती नियम ९ ब प्रमाणे वर विहित केलेली वयमर्यादा पाच वर्षापर्यंत शिथिल करता येते.
बाजार समितीच्या संचालक मंडळांनी २८ नोव्हंबर २०११ ला ठराव घेवून बाजार समिती लाखनीचे सेवेत असलेल्या अस्थाई, हंगामी कर्मचारी यांना पदवी, संगणक व टायपिंग लागू राहणार नाही, असा ठराव घेवून मंजूर करण्यात आला. त्या ठरावामध्ये वयाच्या अटीबाबत ठराव घेण्यात आला नाही. तो ठराव पणन संचालकाकडून मान्यता प्राप्त करून घेणे गरजेचे असताना सुद्धा त्या ठरावाची मान्यता घेण्यात आली नाही व पदे भरण्यात आली.निकषाप्रमाणे सहसचिव स्वप्नील गायधने, लेखापाल लोकेश मोटघरे, लिपीक धनंजय बावनकुळे, किशोर भैसारे, विलास मांडवटकर यांची भरती नियमबाह्य झालेली असताना जिल्हा उपनिबंधक भंडारा यांनी ९ ते २०१२ रोजी यास मंजुरी दिली. समितीचे संचालक केशव मांडवटकर हे भरती निवड समितीमध्ये सभासद असताना सुद्धा स्वत:च्या मुलाला विलास मांवटकर यांना नियुक्ती केली, असाही आरोप डॉ. इलमकार यांनी केला आहे.





