अमरावती,दि.09-शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी करत युवक काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गुरुवारी दुपारी १ च्या सुमारास गुरुकुंज मोझरी येथे आलेल्या वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या गाडीच्या बॉनेटवर चढून घोषणा दिल्या. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या या कृत्याचा निषेध म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी तात्काळ रास्ता रोको आंदोलन केले. श्र्अ.भा. श्रीगुरुदेव सेवामंडळाच्या संचालक अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल आज वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा शपथविधी व्हायचा होता. त्याकरिता ते मोझरी येथील आश्रमात दुपारी १ वाजता आले होते. शपथविधीचा कार्यक्रम संपवून ते २ च्या सुमारास बाहेर पडत असताना अचानकपणे युवक काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी त्यांच्या गाडीला घेराव घातला. त्यावेळी अंगरक्षकांनी वन मंत्र् यांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी नेले. आक्रमक झालेल्या या कार्यकर्त्यांनी वनमंत्र् यांच्या गाडीवर चढून घोषणाबाजी केली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तैनात असलेल्या पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अटक केली. यावेळी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर कांदे व दूधही फेकले.





