कचारगड धनेगाव देवस्थान संस्थेचे बदल अर्ज अखेर रद्द

0
15

सालेकसा,दि.09 : कोणतीही संस्था चालविण्यासाठी कमीतकमी सात किंवा नऊ सदस्य आवश्यक असतात;मात्र पारी कोपार लिंगो मॉ कंकाली देवस्थान कचारगड-धनेगाव देवस्थान या चेरिटेबल संस्थेच्या काही सदस्यांचा मृत्यू झाला, काही पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद निर्माण झाले तर काहींनी राजीनामा दिला. तसेच १५ वर्षांपासून कोणताही नवीन सभासद भरण्यात न आल्याने सदस्यसंख्या केवळ दोन झाली. त्यामुळे धर्मादाय आयुक्तांनी सदर संस्थेचे बदल अर्ज अखेर रद्द केले.

प्राप्त माहितीनुसार, आदिवासी बांधवाचे आराध्य दैवत कचारगड येथे विकासाकरिता तयार करण्यात आलेली संस्था पारी कोपार लिंगो मॉ कंकाली देवस्थान कचारगड-धनेगाव देवस्थानच्या वतीने २००२ पासून पारी कोपारलिंगो मॉ कंकाली नावाने चेरीटेबल संस्थेचे निर्माण करण्यात आले होते. गावातील श्रद्धाळू देवस्थानात पूजा-अर्चना करीत होते. मात्र संस्थेचे उद्देश न समझल्यामुळे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद निर्माण होऊन निवडणूक घेण्यात आली नाही.

यातील तीन सदस्य उदेलाल झाडुराम पंधरे (अध्यक्ष), रजाऊ विक्रम उईके (उपाध्यक्ष), कमलकुुमार लखनलाल परते (सदस्य) यांचा मृत्यू झाला. भादुलाल जोधी उईके यांचे मानसिक संतुलन ढासळले असून ते संस्थेत कार्यरत नाहीत. आनंदाबाई गोपालसिंग उईके यांनी सन २०११ मध्ये राजीनामा दिला. तसेच गोपालसिंग तुकाराम उईके संस्थेत काम करण्यास इच्छूक नाही. नत्थुलाल बलीराम उईके यांना पारी कोपार लिंगोच्या मिटींगमध्ये बोलविण्यात येत नाही.

या संस्थेत आता मात्र दोन सदस्य नामधारी उरले असून बारेलाल प्रेमलाल वरखडे आपल्याला कोषाध्यक्ष मानतात व संतोष फागुलाल पंधरे सदस्य आहेत. कोणत्याही संस्थेला चालविण्याकरिता कमीत कमी ७ ते ९ सदस्य असणे आवश्यक आहे.

पारी कोपारलिंगो मॉ कंकाली नावाने चेरीटेबल संस्थेचे काम नियमित न होत असल्यामुळे आणि १५ वर्षापासून कोणताही नवीन सभासद न भरल्यामुळे धर्मादाय आयुक्तांनी १८ एप्रिल २०१७ रोजी पारी कोपारलिंगो मॉ कंकाली कचारगड संस्थचे क्रमांक (३१४/२०१३) बदल करुन (चेंज रिपोर्ट) अर्ज रद्द केले आहे. गैरअर्जदार नत्थुलाल बलीराम उईके यांच्या वतीने अ‍ॅड.सी.जी. साखरे यांनी बाजू मांडली.