
गडचिरोली, दि.१५: पोलिस व नक्षल्यांमध्ये आज भल्या सकाळी झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली. धानोरा तालुक्यातील गट्टा(फुलबोडी)पोलिस मदत केंद्रांतर्गत भेंडिकन्हार जंगलात ही घटना घडली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सी-६० पथकाचे जवान आज पहाटेपासून भेंडिकन्हार जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवीत होते. सकाळी ६ वाजताच्या सुमारास दबा धरुन बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देताच नक्षलवादी जंगलात पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता एका नक्षल महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरुन शस्त्र व अन्य नक्षल साहित्यही ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. वृत्त लिहिपर्यंत मृत नक्षलीची ओळख पटलेली नव्हती.