“महाराष्ट्र मिशन 1 -मिलीयन” फुटबॉल खेळ महोत्सवाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन

0
14

मुंबई दि 15: “महाराष्ट्र मिशन 1 -मिलीयन” या फुटबॉल खेळ महोत्सवाचा शुभारंभ झाला असून आज दिवसभरात राज्यभरात 10 लाखांहून अधिक विदयार्थी फुटबॉल खेळणार असल्याने आज महाराष्ट्र फुटबॉलमय होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आज सकाळी मुंबई जिमखाना येथे महाराष्ट्र मिशन 1-मिलीयन  या फुटबॉल खेळ महोत्सवाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिशन वन मिलिअनचा झेंडा फडकवून केले. यावेळी क्रीडा मंत्री विनोद तावडे,आमदार राज पुरोहित, मुंबई जिल्हाधिकारी संपदा मेहता उपस्थित होते.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांनी सृदृढ शरीर हवे तर फुटबॉल खेळा असे सांगितले होते आणि फुटबॉल खेळल्याने आपण फिट राहतो. त्यामुळे फिट राहण्यासाठी फुटबॉल हा उत्तम पर्याय आहे.ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनिमित्ताने महाराष्ट्रात आज जवळपास 10 लाखांहून अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहे. अशा प्रकारचा अभिनव कार्यक्रम योजणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे. फिफाचे काही सामने महाराष्ट्रात होणार असून ही आपल्यासाठी आनंदाची बाब असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.
मुलांनी ई-गॅझेट पासून दूर राहावे आणि मैदानावर येवून फुटबॉल खेळाचा आनंद लुटावा हा या उपक्रमामागे प्रमुख उद्देश आहे. त्यासाठी मुलांनी अधिक वेळ मैदानावर द्यावा यासाठीच फुटबॉल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे श्री. तावडे यांनी यावेळी सांगितले.मुंबई जिमखाना येथे आठ वेगवेगळे सामने आयोजित करण्यात आले आहेत. मुलींचा संघ, मुलांचा संघ, मुंबईचे डबेवाले, क्रीडा पत्रकार विरुध्द राजकीय पत्रकार, नॅशनल ब्लाईंड असोसिएशनचे विद्यार्थी, पालघर येथील आदिवासी संघ असे फुटबॉलचे सामने होत आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई जिमखाना येथे उपस्थित सर्व संघाना भेटून शुभेच्छा दिल्या.

याबरोबरच मुंबई शहरात सुमारे जवळपास तीन लाखांहून अधिक मुले-मुली 21 ठिकाणी फुटबॉल खेळणार आहेत.ओव्हल मैदान, क्रॉस मैदान, मुंबई जिमखाना,आझाद मैदान, पोलीस जिमखाना, मरिन ड्राईव्ह, पारशी जिमखाना, मरिन ड्राईव्ह, इस्लाम जिमखाना, मरिन ड्राईव्ह, विल्सन जिमखाना, मरिन ड्राईव्ह, शिवाजी पार्क, दादर, कुपरेज मैदान, गोवन्स स्पोर्टींग क्लब, कर्नाटक स्पोर्टींग क्लब, मुंबई स्कूल स्पोर्टस असोसिएशन, शारीरिक शिक्षण महाविद्यालय, वडाळा, नायगांव पोलीस मैदान, नायगांव,  मुंबई विद्यापीठ, मरिन लाईन्स, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, एलफिन्स्टन, जिल्हा क्रीडा संकुल, धारावी, प्रियदर्शनी पार्क, मलबार हिल,  वरळी स्पोर्टस क्लब, वरळी आणि एम.डी.एफ.ए.सेंट झेविअर्स मैदान, परेल पूर्व येथे फुटबॉल सामने खेळले जाणार आहेत.