
गोंदिया,दि.03ः-बदलती जीवनशैली व तनावामुळे आता मोठय़ांसोबतच लहान बालकांना हृदयरोगाने ग्रासले आहे. जिल्ह्यात ‘आरबीएसके’ म्हणजेच राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमातंर्गत 0 ते १८ वर्ष वयोगटातील तपासणीअंतर्गत ४९३ बालकांना हृदयरोग असल्याचे संपन्न झाले. परंतु, या बालकांच्या कुटुंबियांना आर्थिक परिस्थितीमुळे उपचार व शस्त्रक्रिया शक्य नव्हते. अशावेळी ‘आरबीएसके’ योजना त्यांच्यासाठी जीवनदायी ठरली असून, या योजनेतंर्गत जिल्ह्यातील २६९ बालकांवर हृदयरोग शस्त्रक्रिया करण्यात आली.
राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम १ एप्रिल २0१३ पासून जिल्ह्यात राबविला जात आहे. या कार्यक्रमातंर्गत 0 ते १९ वर्षाचे शाळा, अंगणवाडी, अनुदानीत आर्शमशाळा, शासकीय आर्शमशाळा, शासकीय वसतिगृहात शिकणार्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. जिल्ह्यात १ हजार ४१३ शाळा आहेत. ज्यात ग्रामीण भागात १, ३४७ आणि गोंदिया व तिरोडा शहरात ६६ शाळांचा समावेश आहे. यामध्ये २ लाख ३ हजार ८0१ विद्यार्थी आहेत. या शाळेत राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमांअंतर्गत १ लाख ९0 हजार ४१३ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
तसेच जिल्ह्यात १ हजार ८0१ अंगणवाडी केंद्र असून १ लाख ८ हजार ८१२ बालके शिक्षण घेत आहेत. यापैकी ९९ हजार ४४ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
या सर्व विद्यार्थीं व बालकांच्या आरोग्य तपासणीतून ४९३ बालकांना जन्मजात हृदयरोग असल्याचे निष्पन्न झाले. हृदयरोग शस्त्रक्रियेसाठी जवळपास दीड लाख रूपयांचा खर्च येतो. परंतु, या बालकांच्या कुटुंबियांना आर्थिक परिस्थितीमुळे उपचार व शस्त्रक्रिया शक्य नव्हते. अशावेळी ‘आरबीएसके’ योजना त्यांच्यासाठी जीवनदायी ठरली असून, या योजनेतंर्गत डिसेंबर २0१७ पर्यंत जिल्ह्यातील २६९ बालकांवर नि:शुल्क हृदयरोग शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांना नवीन आयुष्य जगण्याची उमेद मिळाली. या बालकांवर आचार्य विनोभा भावे ग्रामीण अस्पताल सावंगी, श्री सत्यसाई अस्पताल रायपुर, बालाजी हॉस्पीटल भायखला मुंबई, सुराना सेठीया हॉस्पीटल मुंबई येथे नि:शुल्क शस्त्रक्रिया करण्यात आली.





