
आरमोरी,दि.24-स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी अनुदान प्राप्त होवूनही शौचालयाचे बांधकाम न करणार्या सात लाभार्थ्यांविरुध्द गडचिरोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांनी गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नगर परिषदेच्या या कारवाईमुळे शौचालय लाभार्थ्यांमध्ये खळबळ माजली आहे. गडचिरोली नगर परिषदेने केलेली ही कारवाई महाराष्ट्रात पहिली कारवाई असल्याचे बोलले जात आहे.
तक्रार दाखल करण्यात आलेल्या लाभार्थ्यांमध्ये गोकुलनगर येथील माया विकास वाघरे, शाहीद सादीक शेख, आदिल सादीक शेख, लांजेडा येथील प्रभाकर बापूजी टिंगुसले, इंदिरानगर येथील दिवाकर गणपत हाडगे, विसापूर येथील रेमाजी कवडू मेर्शाम व संदिप राजाराम मेर्शाम यांचा समावेश आहे.
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शौचालय बांधकामाकरीता लाभार्थ्यांना १७ हजारांचे अनुदान तीन टप्प्यामध्ये दिले जाते. या योजनेच्या लाभाकरीता संबंधित लाभार्थ्यांनी नगर परिषदेकडे अर्ज केला होता. त्यानुसार नगर परिषदेने माया वाघरे हिच्या बँक खात्यामध्ये दोन टप्प्यामध्ये ११ हजार रुपये जमा केले होते. तसेच इतर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पहिल्या टप्प्यातील ६ हजार रुपये जमा करण्यात आले होते. मात्र संबंधित लाभार्थ्यांनी दोन वर्षानंतरही शौचालयाचे बांधकाम केले नाही.
नगर परिषदेने याबाबत संबंधित लाभार्थ्यांना वारंवार नोटीसी पाठविल्या. मात्र लाभार्थ्यांनी न. प. च्या नोटीसीकडे दुर्लक्ष केले. यामुळे मुख्याधिकार्यांनी २३ फेब्रुवारी रोजी गडचिरोली पोलिस ठाण्यात संबंधित लाभार्थ्यांविरुध्द शौचालय अनुदानाची रक्कम हडप केल्याची तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार गडचिरोली पोलिस ठाण्यात संबंधित लाभार्थ्यांंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर परिषदेच्या या कारवाईमुळे अनुदानाची रक्कम उचल करूनही शौचालयाचे बांधकाम न करणार्या लाभार्थ्यांमध्ये खळबळ माजली आहे.




