
तुमसर,दि.24ः- येथील बस आगारात दोन वाहतूक नियंत्रकांनी कमी मुल्यांची मासिक पास प्रवाशांना दिल्याचे उघडकीस आले. सदर प्रकरणात विभागीय वाहतूक अधिकार्यांनी दोन्ही कर्मचार्यांना तडकाफडकी निलंबित केले. एसटीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी सविस्तर चौकशीचे आदेश दिले आहेत. या आगारात सुमारे २५ वर्षांपूर्वी तिकिट घोटाळा झाला होता.
वाहतूक नियंत्रक माया समरगडे व सिमा मेर्शाम या तुमसर आगारात सवलती पास तयार करतात. मागील काही महिन्यांपासून कमी मुल्यांच्या मासिक पास प्रवाशांना दिल्या गेल्या. तुमसर- नाकाडोंगरी दरम्यान पास क्रमांक 00४, २८५६९३ ३0 ऑगस्ट २0१७ रोजी प्रवाशांना ४.५0 स्टेज अंतर्गत कमी दराची पास देण्यात आली. परिणामी एसटी महामंडळाचे आर्थिक नुकसान झाले. वाहतूक निरीक्षक रचना मस्करे यांनी चौकशी करून त्यांनी प्रकार उघडकीस आणला व दि. १८ फेब्रुवारीला जप्ती कारवाई केली.
विद्यार्थी सवलत पासबाबत चौकशी व बयान नोंदणी सुरू आहे. भंडारा येथील विभागीय वाहतूक अधीक्षक तरोडे यांनी गुरूवारी मध्यानानंतर वाहतूक नियंत्रक माया समरगडे, सिमा मेर्शाम यांना तडकाफडकी निलंबित केले. काही पासधारकांकडून अधिक रक्कम घेतली काय? याचीही चौकशी व तपास सुरू आहे.
तुमसर आगारात ३0 ते ३५ हजार सवलती पास महिण्याकाठी तयार केल्या जातात. दोन वाहतूक नियंत्रक पास तयार करतात. महामंडळाच्या नियमानुसार सवलती पासची रक्कम ठरली आहे. कमी मुल्याची पास वितरीत कशा करण्यात आल्यात हा मुख्य प्रश्न येथे उपस्थित होत आहे. वाहतूक अधिक्षक भंडारा यांनी सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश तुमसर येथील वाहतूक निरीक्षकांना दिले आहे.





