गोंदिया,दि.२८ : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत कर्मचार्यांना कायमस्वरुपी शासकीय सेवेत सामावून घेण्यात घ्यावे, या मागणीसाठी राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारी संघटनेच्यावतीने आज २८ फेब्रुवारीपासून मुंबई येथील आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच जोपयर्ंत मागण्यांची पूर्तता होत नाही, तोपयर्ंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला असून गोंदिया जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांचे कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार असल्याने २८ फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील बाजार समितीचे कामकाज ठप्प पडणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत कर्मचार्यांना तुटपुंज्या मानधनावर कार्य करावे लागत आहे. तसेच मोठ्या संख्येने कर्मचारी कंत्राटी स्वरुपात अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. मात्र, या कर्मचार्यांना स्थायी करण्यासाठी शासनस्तरावर अनेक वेळा पाठपुरावा करूनही हालचाली झाल्या नाहीत. तेव्हा, कर्मचार्यांच्या विविध मागण्यांसह कर्मचार्यांना सेवेत सामावून घ्यावे या मुख्य मागणीसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. गोंदिया जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती गोरेगाव, तिरोडा, आमगाव, सडक अर्जुनी, देवरी, अर्जुनी मोरगाव, गोंदिया येथील एकूण २९ कर्मचारी आंदोलनात सहभागी होणार आहेत. कर्मचार्यांनी याबाबतचे निवेदन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गोंदिया यांना पाठविले आहे. तसेच निवेदनात २८ फेब्रुवारीपासून आयोजित बेमुदत धरणे आंदोलनात आम्ही सहभागी होणार असून पुढील निर्णय होईपयर्ंत आंदोलनात सहभागी राहून त्यानंतर कामावर रूजू होण्याचे सांगितले आहे. असे असले तरी याचा फटका मात्र बाजार समितीच्या कामकाजावर पडणार आहे.




