37.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ लोखंडी पुलाशेजारी रेल नीरच्या बाटलीत नळाचे पाणी

लोखंडी पुलाशेजारी रेल नीरच्या बाटलीत नळाचे पाणी

0
28

blank

नागपूर,दि.26ः- रेल नीरच्या बाटलीत नळाचे पाणी भरून रेल्वेत त्याची सर्रास विक्री करणार्‍या गोरखधंद्याचा आरपीएफने भंडाफोड केला. लोखंडी पुलाच्या काही अंतरावरच लिंक केबिनजवळ एक मोठा ड्रम झाडाच्या सावलीत जमिनीत गाडला होता. त्यात रेल नीरच्या १५0 पाण्याच्या बाटल्या आढळून आल्या. शेजारीच ५0 रिकाम्या बाटल्या आणि बाटल्यांचे १00 झाकनही पडले होते. आरपीएफने संपूर्ण मुद्देमाल जप्त केला, ही कारवाई गुरुवारी करण्यात आली. या घटनेमुळे बाटलीबंद पाण्याचा गोरखधंदा सर्रास सुरू असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
बाटली बंद पाण्याला प्रवाशांची पसंती आहे. तापमान वाढताच पाण्याची प्रचंड मागणी वाढली. या संधीचे सोनं करीत अवैध विक्रेत्यांनी वेगळीच शक्कल लढविली. नागपूर रेल्वेस्थानकाला अवैध वेंडरमुक्त केल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा आऊटरकडे वळविला. लोखंडी पूल ते एनएमसी पुलादरम्यान लिंक केबिनजवळ असलेल्या झाडाच्या सावलीत एक मोठा ड्रम जमिनीत गाडला. कोणाला दिसणार नाही, अशा पद्धतीने ड्रमला ठेवले. त्यात रेल नीरच्या बाटलीत नळाचे पाणी भरून तसेच बाटल सीलबंद करून ड्रममध्ये ठेवल्या होत्या. बाटल्या थंड करण्यासाठी बर्फही होते. आऊटरचा भाग असल्याने येथून गाडीची गती फारच कमी होते. बरेचदा सिग्नल न मिळाल्याने गाड्या थांबूनही असतात. याच वेळात या बाटलीबंद पाण्याची सर्रास विक्री केली जाते. घटनेच्या वेळी प्लास्टिकच्या ड्रममध्ये १५0 रेल नीरच्या बाटल्या मिळाल्या. याशिवाय इतर कंपनीचे लेबल असलेल्या ५0 बाटल्याही आढळल्या. एकूणच या बाटल्यांच्या स्थितीवरून त्यांचा पुनर्वापर केला जात असल्याचे लक्षात येते. मात्र, सील असल्याने सहसा प्रवासी अधिक खोलात जाण्याचा प्रयत्न करीत नाही. त्यामुळे हा गोरखधंदा चांगलाच सुरू होता. विशेष म्हणजे ड्रमजवळच एक नळही आहे. त्याच नळातून रिकाम्या बाटल्यात पाणी भरून त्याची विक्री करीत असावेत, असा दाट संशय व्यक्त करण्यात येत आहे. ड्रमसह संपूर्ण बाटल्या आरपीएफच्या पथकाने जप्त केल्या. ही कारवाई वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त भवानी शंकर नाथ यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक गौरीशंकर एडले, एन.पी. वासनिक, जसबिरसिंह, दीपक पवार, शकील शेख, बी.बी. यादव आणि संजय खंडारे यांनी केली.

blank