
तिरोडा : अदानी फाऊंडेशनकडून सामजिक दायित्वाअंतर्गत नजीकच्या ५१ अंगणवाड्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तसेच महिला मेळावासुद्धा पार पडला.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य राजलक्ष्मी तुरकर, प्रा. सविता बेदरकर, सभापती ललिता जांभुळकर, खंडविकास अधिकारी जमईवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. कंचन रहांगडाले, अंगणवाडी पर्यवेक्षक डॉ. रिचा खरे, योगिता पद्मशाली, देशपांडे तसेच अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेडचे स्टेशन प्रमुख सी.पी. साहू, जनरल मॅनेजर संजय अरगडे, सहयोगी महाव्यवस्थापक ए.पी.सिंग व समन्वयक सुबोध सिंग हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे गावच्या प्रथम नागरिक महिला सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी कार्यकर्त्या व मदतनीस यांचा सहभाग होता.
आपल्या प्रास्ताविकात सुबोध सिंग यांनी सांगितले की, अदानी फाऊंडेश्न मागील पाच वर्षापासून अंगणवाडी सशक्तीकरणाकरिता कार्यरत आहे. त्यातच आणखी एक भर म्हणून अंगणवाडीकरिता शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येत आहे. उद्घाटक राजलक्ष्मी तुरकर यांनी आपल्या भाषणातून अदानी फाऊंडेश्नचा उपक्रम अतिशय कौतुकास्पद असून ‘सुदृढ महिला स्वस्थ परिवार’ ही संकल्पना अदानी फाऊंडेशन खर्या अर्थाने अंमलात आणत असल्याचे सांगितले.
खंड विकास अधिकारी जमईवार यांनी आपल्या भाषणातून, अंगणवाडीच्या मुला-मुलींची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी कशा प्रकारे कार्ययोजना बनविता येईल यावर मार्गदर्शन केले. सुकन्या योजना, निर्भया योजना, बालसंगोपन, त्याचबरोबर अंगणवाडीला बालविवाह माहिती बाल कल्याण विकास अधिकारी यांना देणे आवश्यक आहे. अदानी फाऊंडेशनच्या वतीने त्याचा वापर पुरेपूर मुलांकरिता करावे. जेणेकरुन मुलांना खेळण्याबाळगण्याला पुरेपूर वेळ मिळेल. स्टेशन प्रमुख सी.पी. साहू यांनी आपल्या मनोगतात अदानी फाऊंडेशन हे महिला सक्षमीकरणासंदर्भात वेगवेगळे उपक्रम राबवित असून यापुढेही गरजेवर आधारित महिलांना सुदृढ करण्यासाठी आम्ही अदानी फाऊंडेशनकडून असेच उपक्रम राबवित राहू, अशी ग्वाही दिली.
डॉ.पर्णा बारडोलोई आणि डॉ. रिचा खरे यांनी महिलांना आपल्या आरोग्यासाठी जागरुक राहून योग्य तर्हेने उपलब्ध संसाधनातून तसेच हिरव्या पालेभाज्या यांचे सेवन करुन आपले हिमोग्लोबीन कसे अबाधित राखता येईल यावर मार्गदर्शन केले. शेवटी आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्रा. सविता बेदरकर यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की, स्त्रीने आर्थिक, सामाजिक, मानसिक व बौद्धीकदृष्ट्या सबल होण्याबरोबरच शारीरिकदृष्ट्या सबल होणे महत्वाचे आहे. महिलांचे सक्षमीकरण आणि सबलीकरण या दोन्ही वेगवेगळ्या बाजू आहेत. निर्णय घेण्याचा अधिकार महिलांना द्या. जर झाडाच्या मुळाला पाणी दिले नाही तर निश्चित त्यातून निघणार्या फांद्या, पाने, फुले मजबूत राहणार नाही. तसेच स्त्रीसुद्धा कुटुंबाचे मूळ आहे. जोपर्यंत ती सक्षम होणार नाही तोपर्यंत कुटुंब सक्षम होणार नाही. पर्यायाने देशाच्या विकासासाठी स्त्री सक्षम होणे गरजेचे आहे, असे विचार त्यांनी मांडले.
कार्यक्रमाच्या शेवटी अंगणवाड्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.एकूण १८ गावातील महिला सरपंच, अंगणवाडी सेविका, मदतनीस व १00 च्यावर महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. संचालन जयश्री काळे व आभार स्वप्नील वहाणे यांनी मानले. कार्यक्रमासाठी अदानी फाऊंडेशनच्या कर्मचार्यांनी सहकार्य केले.





