धान्यघोटाळाप्रकरणी नाशिकचे १६ अधिकारी निलबिंत

0
24

मुंबई-राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नाशिक जिल्ह्यातील धान्य घोटाळा चांगलाच गाजला.अखेर राज्याचे अन्न पुरवठा व ग्राहक सरक्षंण मंत्र्याना नाशिकच्या जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासह 9 तहसलिदार असे 16 अधिकायाना निलबिंत करण्याची घोषणा गुरुवारी विधानपरिषदेत करावी लागली.
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील धान्य वितरण व्यवस्थेतील ५ कोटी रुपयांच्या अपहाराची गंभीर दखल घेत राज्य सरकारने निलंबनाचे हत्यार उपसले आहे.तशी घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी विधान परिषदेत केली. यासंबंध‌‌ीचा प्रश्न आमदार जयवंत जाधव, नरेंद्र पाटील आणि हेमंत टकले यांनी उपस्थित केला होता.
सार्वजनिक वितरणासाठीचे साडेपाच कोटी रुपयांचे धान्य २६ जानेवारी रोजी परस्पर विक्रीसाठी जात असताना जप्त करण्यात आले. यासंबंधी स्थानिक अधिकाऱ्यांनी माहिती न दिल्याने सचिव स्तरावर विशेष पथक पाठविण्यात आले. या पथकास गैरव्यवहाराची साखळी आढळून आली. तेव्हा लेखाधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी, नायब तहसीलदार, वाहतूक प्रतिनिधी यांना लगेच निलंबित करण्यात येऊन त्यांची सचिव स्तरावर चौकशी करण्यात येत आहे. अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी बायोमॅट्रिक प्रणाली, बारकोड सिस्टीमसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली असल्याचेही बापट यांनी यावेळी सांगितले.
याप्रकरणी तब्बल १६ अधिकाऱ्यांना निलंबित केल्याची घोषणा मंत्र्यांनी करताच विरोधी बाकांवरील सदस्यांनी मंत्र्यांचे आभार मानले. सुरगाणा तालुक्यातील धान्य अपहाराचा तारांकीत प्रश्न १७व्या क्रमाकांवर होता. प्रश्नोत्तराच्या तासात कमाल ९ ते १० प्रश्नच होतात. परंतु, गुरुवारी हा प्रश्न पहिल्यांदा घेण्यात आला आणि १६ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली.
राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाचे एकूण सात विभाग आहेत. मात्र धान्य वितरण व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी एकही दक्षता पथक (व्हीजलन्स) नाही की भरारी पथक नाही अशी खंत बापट यांनी व्यक्त केली.
हे अधिकारी निलंबित
१. ज्ञानेश्वर जवंजाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी, २. रशिद तडवी (तहसीलदार, सुरगाणा) ३. मनोज खैरनार (तहसीलदार, सिन्नर), ४. अरुण उजागरे (तहसीलदार, नाशिक शहर), ५. गणेश राठोड (तहसीलदार, नाशिक तालुका), ६. कैलास कडलग (तहसिलदार पेठ), ७. महेंद्र पवार (तहसिलदार, इगतपुरी), ८. संदीप आहेर (तहसीलदार, निफाड), ९. नरेशकुमार बहिरम (तहसीलदार त्र्यंबकेश्वर), १०. मंदार कुलकर्णी (तहसीलदार दिंडोरी), ११. रविंद्र सायंकर (नायब तहसीलदार), १२. एस. भोसले (लेखाधिकारी), १३. एस. के. खैरनार (सहाय्यक लेखाधिकारी), १४. अश्विनी खर्डे (अव्वल कारकून), १५. चमनार, १६. त्रिभुवन, (नियतनाशी संबंधित).