एक थेंबही पाणी गुजरातला देणार नाही – गिरीश महाजन

0
9

मुंबई – दमणगंगा-नारपार योजनेचा अजून कोणत्याही प्रकारचा करार झालेला नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वाट्याचे पाणी देण्याबाबत कोणतेही पत्र पाठवले नसल्याचे स्पष्ट केलेले आहे, असे सांगतानाच नारपार योजनेतील एक थेंबही पाणी गुजरातला देणार नाही, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.

नारपार योजनेतील राज्याच्या वाट्याचे पाणी गुजरातला दिले जाणार असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह विरोधकांनी विधानसभेत फलक फडकवले, बैठा सत्याग्रह केला. मंत्र्यांचे उत्तर समाधानकारक नसल्याचे सांगत विरोधकांनी सभात्याग करीत आपली नाराजी व्यक्त केली. दरम्यान, या योजनेचे शुक्रवारी सकाळी सादरीकरण केले जाणार आहे.

प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर छगन भुजबळ, दीपा चव्हाण, जिवा पांडू गावित, पंकज भुजबळ आदी सदस्यांनी नारपार योजनेचे पाणी गुजरातला देणार्‍या सरकारचा निषेध करणारे फलक फडकवत ठिय्या आंदोलन केले. यावर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहात फलक फडकावता येणार नाहीत असे सांगत फलक बाहेर घेऊन जाण्याचे आदेश दिले. परंतु छगन भुजबळ व अन्य सदस्य तसेच बसून राहिले. यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांनी ‘मुख्यमंत्र्यांनी याबाबत निवेदन करतो असे सांगितले परंतु अजूनही निवेदन झाले नसून ते कधी करणार?’ असा प्रश्न उपस्थित केला.

दिलीप वळसे पाटील यांनी या वेळी केंद्रीय मंत्री उमा भारती यांना मुख्यमंत्र्यांनी पाणी गुजरातला देण्याबाबत पत्र लिहिल्याचे सांगत हे पत्र सभागृहात दाखवले. मात्र वळसे पाटील चुकीची माहिती देत असून पत्रात पाणी देण्याबाबतचा कसलाही उल्लेख नसल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. याबाबत कोणताही करार झालेला नसून पाणी वाटपाचा मुद्दाच उपस्थित होत नाही असे सांगत महाराष्ट्राच्या वाट्याचे एक थेंब पाणीही गुजरातला देणार नाही असे स्पष्ट केले.