25 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home Top News छत्तीसगडमध्ये नक्षलींच्या म्होरक्याचे आत्मसर्मपण

छत्तीसगडमध्ये नक्षलींच्या म्होरक्याचे आत्मसर्मपण

0
27
file photo

रायपूर(वृत्तसंस्था)दि.26ः-नक्षलवाद्यांच्या अनेक घातपातांच्या कारवायांमध्ये सक्रीय सहभाग असलेला व अनेक दिवसांपासून पोलिसांना हवा असणार्‍या नक्षलींच्या एका डेप्युटी कमांडरने रविवारी छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे पोलिसांसमोर आत्मसर्मपण केले.
मुचकी बुद्र उर्फ नरेश (३२) असे त्याचे नाव असून, त्याच्यावर तब्बल आठ लाख रुपयांचा इनाम होता. त्याने पोलिस अधीक्षक अभिषेक पल्लव यांच्यासमोर दंतेवाडा येथे शरणागती पत्कारली. तो दंतेवाडामधील मलंगीर भागात कार्यरत असलेल्या नक्षलवाद्यांच्या लष्करी तुकडी क्रमांक-२४ चा डेप्युटी कमांडर होता.
अनेक नक्षली हल्ल्यांमध्ये त्याचा सशस्त्र सहभाग होता. यात २0१0 मध्ये काँग्रेस नेते अवधेश गौतम यांच्यावर नकुलनार गावातील निवासस्थानी झालेला नक्षली हल्ला, ज्यामध्ये दोन नागरिकांचा मृत्यू तर एक नक्षलवादी ठार झाला होता. तसेच, २0१२ मध्ये सीआयएसएफच्या पथकावर किरंदूलमध्ये झालेला हल्ला, ज्यामध्ये सहा जवान आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. यांचा प्रामुख्याने समावेश असल्याची माहिती पोलिस अधीक्षक पल्लव यांनी दिली.
आपण २00७ मध्ये नक्षलवादी संघटनेत सहभागी झालो व २0१0 मध्ये डेप्युटी कमांडर बनलो असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. शिवाय शस्त्रास्र बाळगण्यासाठी त्याला संघटनेकडून प्रोत्साहन स्वरुपात १0 हजार रुपये देखील देण्यात आलेले आहेत, अशीही पोलिसांनी माहिती दिली. सरकारच्या आत्मसर्मपण व पुनर्वसन धोरणानुसार त्याच्यावर पुढील कारवाई केली जाईल, असेही सांगण्यात आले आहे.

blank