बीड(विशेष प्रतिनिधी)दि.01 – विधानसभा निवडणुका पार पडून निकालही जाहीर झालेला आहे, मात्र मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार यावरून मागील तीन-चार दिवसांपासून राज्यभरात पेचप्रसंग निर्माण झालेला आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे राज्यात नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली आहे. यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. परंतु, राज्यकर्त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी नैसर्गिक संकट निवारणासाठी वेळ मिळत नसल्याकारणाने दहीफळ वडमाउली (ता. केज, जि. बीड) येथील शेतकरी पुत्र श्रीकांत गदळे यांनी थेट मलाच मुख्यमंत्री करा, मी शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावेन, अशा प्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे राज्यपाल यांच्याकडे गुरुवारी पाठवले आहे.या पत्रामुळे राज्यात एकच चर्चा सुरु झाली आहे.
मला मुख्यमंत्री करा, अशा प्रकारचे निवेदन राज्यपाल यांना जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत पाठवण्यात आले आहे, यामधील असा आहे मजकूर, किसानपुत्र श्रीकांत विष्णू गदळे (मु. पो. दहिफळ वडमाउली, ता . केज) येथील रहिवासी आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, भाजप व शिवसेना यांच्या मुख्यमंत्रिपदाचा तिढा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग व सर्वसामान्य वर्ग अडचणीत सापडला आहे.राज्यातील जनतेच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात यावा म्हणून महाराष्ट्राच्या राज्यपाल साहेबांना विनंती करतो की, भाजप-शिवसेना मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटेपर्यंत मला मुख्यमंत्रिपदाचा पदभार देण्यात यावा. जेणेकरून मी शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तत्काळ सोडवीन आणि त्यांना न्याय देईन, असा मी विश्वास देतो. साहेबांनी माझ्या निवेदनाची दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने लक्षवेधी आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही गदळे यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्यपाल यांना दिलेल्या निवेदनामध्ये दिला आहे.





