28.9 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home Featured News ५८ दिवसांच्या देखभालीनंतर कृत्रिमरित्या उबवली सापांची अंडी

५८ दिवसांच्या देखभालीनंतर कृत्रिमरित्या उबवली सापांची अंडी

0
50

गडचिरेाली,दि.7:कृत्रिमरित्या सापांची अंडी उबवून पिलांना जन्म देण्याचा प्रयोग गडचिरोली येथील सर्पमित्रांनी यशस्वी करुन दाखवला आहे. योग्य वातावरण निर्मिती करुन ५८ दिवस देखभाल केल्यानंतर सर्पमित्रांना हे यश आले. अशाप्रकारचा जिल्ह्यात झालेला हा पहिलाच प्रयोग आहे.गडचिरोली येथील सर्पमित्र अजय कुकडकर यांनी ७ सप्टेंबर रोजी विश्रामगृहात ‘तस्कर’ प्रजातीच्या बिनविषारी सापास पकडले होते. काही वेळातच या सापाने ७ अंडी दिली. पावसाळ्याचे दिवस असल्याने व सर्वत्र पाणी असल्याने अंडी ठेवायची कुठे, असा प्रश्न कुकडकर यांना पडला. निर्जनस्थळी सापाला सुखरुप सोडल्यानंतर त्यांनी अंड्यांना कृत्रिमरित्या उबवण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात त्यांनी वनविभागाचे क्षेत्रसहायक प्रमोद जेनेकर व मित्रांच्या मदतीने सर्व अंडी एका बरणीत ठेवली. अंडी सुरक्षित राहावी, यासाठी आवश्यक वातावरणाची निर्मिती केली. दररोज अंड्यांची देखभाल केली. त्यासाठी भंडारा येथील काही अनुभवी सर्पमित्रांचीही मदत घेतली. ५८ दिवसांच्या या प्रक्रियेनंतर ४ नोव्हेंबरला अंड्यांमधून ५ पिलांनी जन्म  घेतला, तर दोन अंडी खराब झाली. या पिलांना नंतर जंगलात सुखरुप सोडण्यात आले. यावेळी क्षेत्रसहायक प्रमोद जेनेकर, मनोज पिपरे, दैवत बोदेले, गणेश देवावार, सचिन जीवतोडे, होमदेव कुरवटकर, नीरज साबळे, मकसूद सय्यद, गोलु जुवारे उपस्थित होते.

तस्कर’ सापाविषयी माहिती

झाडीपट्टीत ‘डोंगरवेल्या’ म्हणून ओळख असलेल्या ‘तस्कर’ सापाचे शास्त्रीय  नाव Elaphe Helena असे आहे. भारतीय उपखंडात आढळणारा अतिशय निरुपद्रवी व  बिनविषारी असा हा साप आहे.  इंग्रजीत त्याला ट्रिंकेट असे म्हणतात. अतिशय शांत स्वभावाचा हा साप हाताळायला अतिशय सोपा आहे. ‘तस्कर’ सापाची लांबी साधारणपणे  अर्धा ते १ मीटरपर्यंत, तर जाडी १ इंचापर्यंत असते. अंगावर सुरेख पट्टे असतात  व ते  बुद्धीबळातील पटासारख्या छोट्या काळ्या, पांढऱ्या चौकोनांनी भरलेले असतात. हा मुख्यत्वे दक्षिण भारत, श्रीलंकेमध्ये आढळतो. महाराष्ट्रातही विपुल प्रमाणात आढळतो.  छोटी जंगले, मानवी वस्त्यातील गव्हाणी, अडगळीच्या जागा ह्या तस्कराच्या आवडत्या जागा आहे