सालेकसा,दि. १४ : येथील गांधी प्रतिमा परिसरात ओबीसी संघर्ष कृती समिती संलग्न ओबीसी विद्यार्थी संघटना सालेकसा, तालुका पत्रकार संघ सालेकसाच्या माध्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन बाल दिवसाचे औचित्य साधून स्वर्गीय वासुदेव हटवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ करण्यात आले होते. यावेळी गोटूल आदिवासी संस्था सालेकसाचे सुद्धा सहकार्य मिळाले. यावेळी 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले.बाई गंगाबाई रुग्णालय गोंदिया रक्तपेढीच्या माध्यमातून रक्त संकलन करण्यात आले. सदर रक्तदान शिबिरात विविध सामाजिक संस्था व समाज कार्यात अग्रेसर असणाऱ्या लोकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ओबीसी कृती समिती चे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे हे होते.तर खोब्रागडे , मनसे तालुका अध्यक्ष ब्रजभूषण बैस, तालुका ओबीसी संघर्ष कृती समिती सालेकसा तालुका अध्यक्ष मनोज डोये, निकेश गावड इत्यादी मंडळी उपस्थित होते. तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राकेश रोकडे, सचिव बाजीराव तरोने, पवन पाथोडे तसेच सामाजिक क्षेत्रातील निलेश बोहरे, रवी चुटे ह्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे अध्यक्ष बबलू कटरे यांनी तरुणांना रक्तदानाचे महत्त्व सांगत जातिव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात.परंतु रक्ताला कुठलीही जात नसून कोणत्याही जातीचा व्यक्ती हा कोणत्याही जातीच्या व्यक्तीला रक्त देऊ शकतो. त्यामुळे समाजात जेव्हा गरज असते त्यावेळेस जात बघितली जात नसताना इतर वेळेस का बरं जातीवर बोट ठेवून नियम केले जातात असा सवाल करीत रक्तदानातून जातिभेद दूर होतो असे वक्तव्य केले. नितीन फुलझेले यांनी सूत्रसंचालन केले तसेच ब्रजभूषण बैस यांनी आभार मानले. विविध सामाजिक संस्थांनी तसेच शासकीय कर्मचाऱ्यांनी आर्थिक मदत करून कार्यक्रमास अप्रत्यक्षपणे सहकार्य केले.





