25.1 C
Gondiā
Thursday, August 20, 2026
Home विदर्भ रेतीघाटावर खासदारांची धाड, तहसीलदार अडचणीत

रेतीघाटावर खासदारांची धाड, तहसीलदार अडचणीत

0
36

भंडारा,दि.17ः- रेतीसाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यात रेती माफियांनी प्रचंड उच्छाद माजविला आहे. रेती चोरीच्या वाढत्या तक्रारींमुळे खा. सुनील मेंढे यांनी प्रत्यक्षात पवनी तालुक्यातील रेती घाटांची पाहणी केली असता अनाकलनीय रेतीचा उपसा पाहून तेसुद्धा चक्र ावले. या संपूर्ण प्रकरणाची माहिती खा. मेंढे यांनी विभागीय आयुक्तांना दिली असून पवनीचे तहसीलदारांसह अनेक प्रशासकीय अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे रेतीघाटाचे कंत्राटदार हे सर्वपक्षीय नेते असून यांची दादागिरी चालते.यां ठेकेदारांनी तर काही तथाकथीत पत्रकारांना मासिक व हप्ता बांधून त्यांनाही आपले गुलाम करुन ठेवले आहे.
पवनी तालुक्यातील बेधडक सुरू असलेल्या रेती चोरीसंदर्भात खा.सुनील मेंढे यांनी पवनीचे तहसीलदार यांच्याकडे जाऊन विचारणा केली. दरम्यान तहसीलदारांनी सांगितलेल्या प्रशासकीय परवानगी संबंधी माहितीमध्ये तफावत आढळल्याने खा. मेंढे यांनी येनोळा घाटाच्या उपस्याचे परवानगी आदेश दाखवा, असे सांगताच तहसीलदारांची भंबेरी उडाली. चुकीची माहिती मिळत असल्याने खासदार सुनील मेंढे यांच्या आदेशाने तहसीलदार पवनीची चमू, पोलिस विभाग आदी रेतीघाटाकडे निघाले. तेव्हा भोजापुरातील दोन घाटावर ४0 ब्रास रेतीसाठा दिसून आला. खातखेडा घाटात ३00 व १५0 ब्रास रेतीसाठा तर येनोळा घाटावर ५ हजार ब्रास रेतीसाठा आढळून आला. हा येनोळा घाट अधिकृत असल्याचे तहसीलदार सांगत होते. परंतु, त्याचा परवानगी आदेश ते दाखवू शकले नाहीत.
अशाप्रकारे अवैधरीत्या मोठय़ा प्रमाणात रेती उत्खनन सुरू असल्याने सर्व नदीपात्राची ड्रोनद्वारे शुटींग करण्याचे निर्देश खासदार मेंढे यांनी दिल्यानंतर दुसर्‍याच दिवशी चित्रीकरण करण्यात आले. त्यात प्रचंड उपसा झाल्याचे स्पष्ट दिसून आले. याबाबतची संपूर्ण माहिती विभागीय आयुक्तांना दिली जाणार असून विभागीय आयुक्त तहसीलदार तथा अन्य महसूल अधिकार्‍यांवर काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागून आहे.

पर्यावरण मंत्र्यांना खासदारांचे पत्र
गोसे धरणामुळे वैनगंगेच्या पलिकडील भागात रेतीची निर्मीती होत नाही. तरीही माती आणि दगड लागेपर्यंत रेतीचा उपसा सुरू असल्याने पर्यावरणाची हानी होत आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी रेतीची निर्मीतीच होत नाही अशा घाटांचा लिलावच होऊ नये, ते घाट कायमचे बंद व्हावे, जेणेकरुन त्या घाटांमध्ये काही प्रमाणात रेतीची तूट भरून निघेल, यासाठी आपण पर्यावरण मंत्र्यांना पत्र पाठविल्याचे खा. सुनील मेंढे यांनी सांगितले. याशिवाय, रेती चोरीला चालना देणार्‍या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी लेखी तक्र ार विभागीय आयुक्तांकडे केल्याचे ते म्हणाले.