नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.१८ः– संसदेच्या हिवाळी अधिवेशनला पहिल्याच दिवशी जोरदार सुरूवात झाली आहे. माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली अर्पण करून कामकाजाला सुरूवात झाली. त्यानंतर मात्र विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी करून लोकसभा दणाणून सोडली.काँग्रेसचे खासदार अधीररंजन चौधरी म्हणाले की, १०८ दिवसांपासून फारूक अब्दुल्ला यांना ताब्यात घेतलेले आहे. ही कोणती जुलुमशाही आहे? संसदेत उपस्थित राहणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यांना संसदेत आणावे, अशी आमची मागणी आहे. चौधरी यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका यांच्या सुरक्षेचा मुद्दाही लोकसभेत उपस्थित केला. ते म्हणाले की, त्यांचे एसपीजी सुरक्षा कवच काढण्यात आले आहे. हा मुद्दाही मी येथे मांडू इच्छितो.त्यानंतर विरोधी पक्षांचे काही खासदार हौद्यात उतरून घोषणाबाजी करत होते. ”विपक्ष पर हमला बंद करो, फारूक अब्दुल्ला जी को रिहा करो…” अशा घोषणाही ते देत होते. शिवाय ”न्याय द्या, न्याय द्या..” अशा घोषानेही संसद दणाणून गेली.





