
नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.18ः- महाराष्ट्रातील सरकार स्थापनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आज संभ्रम वाढवणारे विधान केल्याने खळबळ माजली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी नवी दिल्लीत गेलेले शरद पवार यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी सरकार स्थापनेबाबत प्रश्न विचारला असता, याबाबत शिवसेना आणि भाजपला विचारायला हवे, असे उत्तर देत पवारांनी गुगली घेतली.
महाराष्ट्रातील सरकार स्थापनेबाबत शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या होणाऱ्या भेटीवर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. शरद पवार हे सध्या दिल्लीत आहेत. आज सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करण्यासाठी जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, त्यांनी भेटीची निश्चित वेळ सांगितली नाही. या भेटीतून सत्ता स्थापनेचा तिढा सुटेल असे वाटत असतानाच, त्यांनी संभ्रम वाढवणारं विधान केलं आहे.
महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेविषयी त्यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारले. त्यावर याबाबत तुम्ही भाजप आणि शिवसेनेलाच विचारायला हवे, असे उत्तर त्यांनी दिले. त्यांच्या या विधानाने पुन्हा संभ्रम वाढला आहे. तसेच सोनिया गांधी यांच्याशी होणारी भेट ही शिष्टाचाराचा भाग आहे, असं त्यांनी स्पष्ट केले. यातून ते सोनिया गांधी यांच्या भेटीअगोदर आपले पत्ते उघड करू इच्छित नाहीत, हे स्पष्ट होत आहे.
शिवसेनेसोबत सरकार स्थापन करणार का, असे पवार यांना पत्रकारांनी विचारले. त्यावर ‘भाजप आणि शिवसेनेला विचारा, ते एकत्र होते,’ असे उत्तर पवार यांनी दिले. शिवसेना आणि भाजप एकत्र लढले होते. आम्ही स्वतंत्र लढलो होतो. राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे एकत्र लढले होते, असे ते म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांनी ही माहिती दिली. या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे. त्यामुळे राज्यात पर्यायी सरकार निर्माण झाले पाहिजे, असा निष्कर्ष या बैठकीत काढण्यात आला.आम्ही राज्यात काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढलो. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना काँग्रेससोबत चर्चा केली जाईल, त्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे मलिक म्हणाले होते.





