आमगाव,दि.20ः संयुक्त राष्ट्र संघाने बाल हक्क संहिता स्वीकारण्यास दिनांक 20 नोव्हेंबर 2019 रोजी 30 वर्ष पूर्ण होत असून या द्वारे प्रत्येक बालकास त्याचा मूलभूत हक्क व संरक्षण देण्याची जबाबदारी ही समाजातील प्रत्येक घटकाची असल्याचे मत विजय ठोकणे यांनी व्यक्त केले. ते जिल्हा परिषद हायस्कुल आमगाव येथे आयोजित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित मार्गदर्शन कार्यशाळेत बोलत होते. यावेळी आमगाव पोलीस स्टेशन चे सहयाय पोलीस निरीक्षक श्री सिंग, केंद्र प्रमुख श्री मेळे, श्री हटवार, साधनव्यक्ती वशिष्ट खोब्रागडे, गजानन धावडे, विशेष शिक्षक सतीश गजभिये, कु आम्रपाली उके, शाळेचे प्राचार्य परदेशी, शिक्षक महेंद्र सोनवणे इत्यादी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या पोलीस विभाग, शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग व चाईल्ड लाईन या चार विभागामार्फत जिल्ह्यात दिनांक 14 ते 20 पर्यंत बाल हक्क व संरक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्य जिल्ह्यातील काही निवडक उच्च प्राथमिक शाळा, महाविद्यालय व आश्रमशाळा मध्ये विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समग्र शिक्षा अभियानाचे दिव्यांग विभागाचे जिल्हा समन्वयक मार्गदर्शन करताना बोलत होते.
ते पुढे म्हणाले की या संहितेने बालकांना मुख्य चार अधिकार दिले आहेत, त्यात जगण्याचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, सहभागाचा अधिकार व संरक्षण चा अधिकार दिला आहे. हे सर्व अधिकार सर्व बालकांना मिळवून देण्याची जबाबदारी समाजातील प्रत्येक घटकांची असून बाल मजुरी, बाल विवाह, व्यसनाधीनता व बाल लैंगिक अत्याचार या विषयी मार्गदर्शन केले.यावेळी पोलीस निरीक्षक श्री सिंग यांनी बालकांसाठी असलेल्या विविध कायद्यांची मुलांना विस्तृत माहिती दिली व कोणत्याही अत्याचारास बळी न पडता तक्रार करण्याचे धाडस दाखवावे असे आव्हान यावेळी केले.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन शिक्षक महेंद्र सोनवणे यांनी तर आभार प्राचार्य परदेशी यांनी मानले.





