वाशिम, दि. २० : जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सहाही पंचायत समितींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने १९ नोव्हेंबर २०१९ रोजी जाहीर केला आहे. जिल्ह्यात १९ नोव्हेंबरपासूनच जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता सुद्धा लागू झाली आहे. या आचारसंहितेमधील सर्वांनी पालन पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार वाशिम जिल्हा परिषदाव त्यांतर्गत येणाऱ्या वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा लाड व मानोरा या सहा पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ७ जानेवारी २०२० रोजी मतदान; तर ८ जानेवारी २०२० रोजी मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यात १९ नोव्हेंबर पासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकांसाठी १८ डिसेंबर २०१९ पासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरूवात होईल. मतदान ७ जानेवारी २०२० रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत पार पडेल. मतमोजणी ८ जानेवारी २०२० रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता आचारसंहितेमधील तरतुदींचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी केले आहे.
असा आहे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम
- नामनिर्देशनपत्र सादर करणे- १८ ते २३ डिसेंबर २०१९
- नामनिर्देशनपत्रांची छाननी- २४ डिसेंबर २०१९
- अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे- ३० डिसेंबर २०१९
- अपील असल्यास उमेदवारी मागे घेणे- १ जानेवारी २०२०
- मतदानाचा दिनांक- ७ जानेवारी २०२०
- मतमोजणीचा दिनांक- ८ जानेवारी २०२०





