मुंबई,दि.23 – भाजपाने थेट राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनाच सोबत घेत सत्ता स्थापन केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसेच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामुळे शरद पवारांना अंधारात ठेवून अजितदादांनी हा निर्णय घेतल्याची जोरदार चर्चा रंगलेली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांचा हा वैयक्तिक निर्णय असल्याचे सांगत याला पक्षाचा पाठिंबा नसल्याचे पवारांनी म्हटले आहे.अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे असे ट्वीट शरद पवार यांनी केले आहे. अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना शरद पवारांना याबाबतची कल्पना होती का, याबाबत स्पष्टपणे सांगितले नाही. शरद पवार साहेबांना सुरुवातीच्या काळात या गोष्टी माहित्या होत्या. परंतू नंतरच्या काळामध्ये पहिल्या काळात त्यांना मी स्थिर सरकार देण्याबाबत सांगत होतो. कोणीतरी दोघांनी किंवा तिघांनी एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकणार नव्हते. या आधीही काँग्रेस, राष्ट्रवादीने स्थिर सरकार दिले आहे. शिवसेना-भाजपाने स्थिर सरकार दिले आहे, असे अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर सांगितले.मध्यरात्री साडेबारा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघे राज्यपालांना भेटले. एक वाजता राज्यपालांनी केंद्राकडे शिफारस केली. राष्ट्रपती राजवट हटवण्याची सकाळी सातची शपथविधीची वेळ ठरली. काँग्रेस शिवसेनेला बाजूला ठेवून भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले. यात प्रफुल्ल पटेल यांनी मोठी भुमिका बजावली आहे.





