मुंबई(विशेष प्रतिनिधी)दि.26 – महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा भूकंप झाला आहे, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असे वृत्त माध्यमांनी दिले आहे. परंतु, भाजप किंवा राष्ट्रवादीकडून अद्याप यासंदर्भात अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. राष्ट्रवादीचे नेते आणि पवार कुटुंबियांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी वारंवार चर्चा केली जात होती. त्यानंतरच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असे सांगितले जात आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या राजीनाम्याचे वृत्त समोर येत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. यात ते देखील राजीनामा देणार असे वृत्त आहे.
अजितदादांच्या बंडामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षासोबत पवार कुटुंबात फूट पडत असल्याचे दिसून येत असल्याने शरद पवारांनी हालचाली सुरू केल्या होत्या. सोमवारी रात्री महाविकासआघाडीच्या 162 आमदारांचे शक्तिप्रदर्शन केल्यानंतर अजित पवारांशी संपर्क साधला गेल्याची माहिती समोर आली होती. अजित पवार राष्ट्रवादीच्या संपर्कात असून त्यांचे बंड शांत करण्यात यश येईल, असे सांगण्यात आले होते. अजित पवारांच्या समर्थक आमदारांच्या गटालाबरोबर घेऊन फडणवीसांनी राज्यात भाजपाचे सरकार स्थापन केले होते. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीने त्यांची विधिमंडळ नेतेपदावरून हकालपट्टी केली होती.जयंत पाटील यांना विधिमंडळ नेतेपदाचे अधिकार देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्याबाबत राज्यपालांना आणि विधान मंडळाला कळविण्यात आले होते. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते, सर्वोच्च न्यायालयानंही उद्या बहुमत सिद्ध करण्यास राजकीय पक्षांना आदेश दिले होते. भाजपा आणि अजित पवारांच्या सरकारकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी 30 तासांचा अवधी होता. तत्पूर्वीच अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानं फडणवीस सरकार कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भाजपची सत्ता धोक्यात
उल्लेखनीय बाब म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने सकाळीच महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेवर महत्वाचा निकाल दिला. सीएम देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारला 30 तासांत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशात बहुमत आपल्याकडेच असल्याचा दावा करणाऱ्या भाजपने फ्लोअर टेस्टच्या अवघ्या काही तासांपूर्वी माघार घेतली असे दिसून येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात.
महाराष्ट्रातील सत्ता नाट्य…
भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार आणि त्यांच्या सहकारी आमदारांचा पाठिंबा घेत 23 नोव्हेंबर रोजी सत्ता स्थापित केली. याच दिवशी राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली आणि फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अचानक घडलेल्या या घडामोडीनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेनेने आपल्या सर्वच आमदारांशी बोलून पत्रकार परिषद आयोजित केली. यामध्ये राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांनी आपली फसवणूक झाली असून शरद पवारांसोबतच असल्याचे स्पष्ट केले. अशात सर्वच आमदारांनी शरद पवारांच्या समर्थनात येऊन अजित पवारांना एकटे पाडले आणि प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. यानंतरही पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेते मंडळींनी अजित पवारांनी भेट घेऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला.





