31.3 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ जिल्हाधिकाऱ्यांनी केली जळालेल्या धानाच्या पुंजण्याची पाहणी

जिल्हाधिकाऱ्यांनी केली जळालेल्या धानाच्या पुंजण्याची पाहणी

0
26

गोंदिया दि.28ः देवरी तालुक्यातील चिचगड अप्पर तहसिल कार्यालयांतर्गत येणाऱ्या काही गावातील शेतकऱ्यांचे शेतातील धानाचे पुंजणे जाळल्याची घटना 26 नोव्हेंबरला मध्यरात्री घडल्याचे उघडकीस आले. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी 28 नोव्हेंबर रोजी नुकसान झालेल्या धानाच्या पुंजण्यांची पाहणी केली. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी व जि.प उपाध्यक्ष अलताफ हमीद यांच्या सोबत पाहणी करून जिल्हा परिषदेकडुन तात्काळ मदत देण्यासंदर्भात चर्चा केली.
या घटनेत चिचगड, मोहाडी, डोंगरगाव, सुंदरी, कडीकसा व पाउलझोला अशा एकुण 6 गावातील 38 शेतकऱ्यांचे पुंजणे जळुन खाक झाले. या घटनेतील पंचनाम्याची कार्यवाही पुर्ण करण्यात आली आहे.या घटनेत एकुण 62.33 हेक्टर क्षेत्रातील शेतपिकांचे शेतात ठेवलेले पुंजणे जळाले. या घटनेत एकुण 41 लाख 27 हजार 518 रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या घटनेतील नुकसानीची पाहणी करण्यासाठी जि.प. अपर मुख्य कार्यपालन अधिकारी एस.इ.ए हाश्मी, उपविभागीय अधिकारी रविंद्र राठोड, जिल्हा कृषि विकास अधिकारी अनुप शुक्ला, अप्पर तहसिलदार चिचगड एन.जे. उइके, नायब तह. शिंदे, खंड विकास अधिकारी मनोज हिरुळकर, देवरी तालुका कृषि अधिकारी जी.जी. तोडसाम, पं.स.कृषि अधिकारी पवनकर, चिचगड वनक्षेत्र अधिकारी फुले, दोन्ही गावातील सरपंच तथा तलाठी व मंडळ अधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
धानाच्या पुंजक्याला आग लागुन झालेल्या नुकसानाची जिल्हा परिषद गोंदियाकडुन तात्काळ मदत देण्यासाठी शेतकऱ्याकडुन अर्ज घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच सदरील घटनेसंदर्भात जिल्हाधिकारी यांनी घटनेची माहिती वरीष्ठ कार्यालयास दिली. तसेच संबंधित अधिकारी यांना शासनस्तरावर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यास पुढील कार्यवाही लवकरात लवकर करण्याचे निर्देश देऊन जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले.