मुंबई,दि.01 : राज्याच्या १४ व्या विधानसभा अध्यक्षपदावर महाराष्ट्र विकास आघाडीचे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांची बिनविरोध निवड. भाजपाने आपले उमेदवार किसन कथोरे यांचा अर्ज मागे घेतला आहे. दुपारी दोन वाजता नव्या अध्यक्षाची घोषणा होईल.किसन कथोरे भाजपचे ठाणे जिल्ह्यातील मुरबाडचे तर नाना पटोले हे विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील साकोलीचे काँग्रेस आमदार आहेत.विधानसभा अध्यक्षपद निवडणूक बिनविरोध व्हावी असा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता. सत्ताधारी आणि विरोधकांची एकत्रित बैठक झाली. अध्यक्षांचे पद वादात आणायचं नाही, अध्यक्ष हा कोणत्याही पक्षाचा नसतो, सभागृह चालविण्याची भूमिका त्यांची असते. त्यामुळे किसन कथोरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येत आहे. अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.
विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल नाना पटोलेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले. यावेळी मुख्यमंत्री ठाकरेंनी माजी मुख्यमंत्र्यांना अध्यक्ष महोद वरुन जोरदार टोला लगावला. त्यावेळी सभागृहात एकच हशा पिकला. नाना पटोले सर्वांना समान न्याय देतील, अशी अपेक्षा व्यक्त ठाकरेंनी त्यांना शुभेच्छा दिल्या.त्यापुर्वी हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी नाना पटोलेंना अध्यक्षपदाची सुत्रे दिली.
यानंतर हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी पटोलेंकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. पटोले विधानसभा अध्यक्षपदी स्थानापन्न झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांचे अभिनंदन केले. नाना पटोले शेतकऱ्यांचे नेते आहेत. भाजपासोबत असतानाही त्यांनी त्यांचा आक्रमक बाणा कायम ठेवला. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत म्हणून त्यांनी थेट खासदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपामधून बाहेर पडले. त्यांचा स्वभाव अतिशय बंडखोर आहे. कोणाचीही भीडभाड न बाळगता ते त्यांची मतं व्यक्त करतात,अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पटोलेंचे तोंडभरुन कौतुक केले. पटोलेंकडे पाहत अध्यक्ष महोदय म्हणावंच लागते का? असा प्रश्न विचारत उद्धव यांनी फडणवीसांचा चिमटा काढला. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.आपली २५ वर्षांची मैत्री आहे. त्यामुळे ते नातं लक्षात घेऊन तुम्ही वेळोवेळी सुधारणा सुचवाल अशी अपेक्षा करतो,असे मुख्यमंत्री म्हणाले. यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील पटोलेंचं अभिनंदन केले.
विधानसभेत ठाकरे सरकारकडे १६९ सदस्यांचे बळ आहेत, तर भाजपला ११४ सदस्यांचा पाठिंबा आहे. ४ सदस्य तटस्थ आहेत. अध्यक्ष निवडणूक जिंकण्यासाठी १४५ सदस्यांचा पाठिंबा हवा आहे. अध्यक्षांची निवड बिनविरोध करण्याची प्रथा आहे. शनिवारी सकाळी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यात नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्याला दिल्लीहून पक्षश्रेष्ठींची मंजुरी घेण्यात आली. पृथ्वीराज चव्हाण हे अध्यक्षपदासाठी इच्छुक होते. पण राष्ट्रवादीच्या विरोधामुळे नाना पटोले यांची अखेर वर्णी लागली.
विदर्भाला झुकते माप
नाना पटोले १९९९ ते २०१४ पर्यंत काँग्रेस आमदार होते. २०१४ मध्ये ते भाजप खासदार झाले. मोदींवर नाराज होऊन त्यांनी खासदारकी सोडली. या वेळी त्यांनी मंत्री परिणय फुके यांचा पराभव केला. आमदारकीची त्यांची चौथी टर्म आहे. सध्या ते राष्ट्रीय किसान काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. शेतकरी व कुणबी नेते असलेले पटोले हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर विरोधक होत.
मा. विधानसभा अध्यक्ष
श्री नानाभाऊ फाल्गुनराव पटोले यांचा अल्प परिचय
शिक्षण – पदवीधर
१९९२ – भंडारा जिल्हा परिषदेचे सदस्य
१९९४ – भंडारा जिल्हा बँकेचे संचालक
१९९९- महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य
२००४ – महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य
२००९ – महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य
२०१४ – लोकसभा सदस्य
२०१९ – महाराष्ट्र विधानसभा सदस्य
डिसेंबर २०१७ पासून भारतीय राष्ट्रीय किसान काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून कार्यरत
परिवार :-
वडील : स्वर्गीय फाल्गुनराव पटोले
आई : मीराबाई फाल्गुनराव पटोले
पत्नी : सौ. मंगलाताई नानाभाऊ पटोले
भाऊ : श्री विनोद फाल्गुनराव पटोले,
नि.उपविभागिय पोलीस अधिकारी
वाहिनी : सौ.ज्योत्सना विनोद पटोले
मुलगी १) निता नानाभाऊ पटोले
मुलगी २) प्रिया नानाभाऊ पटोले
मुलगा : राहुल नानाभाऊ पटोले
पुतणे : १) रिक्की विनोद पटोले
२) एड. जितेंद्र विनोद पटोले




