
जि.प. व पं.स. सार्वत्रिक निवडणूक तयारीचा आढावा
- 852 केंद्रावर होणार मतदान
- 7 लाख 45 हजार 577 मतदार बजावणार मतदानाचा हक्क
वाशिम, दि. 04 : 7 जानेवारी 2020 रोजी वाशिम जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणूकीसाठी विविध विभागांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर विविध कामांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ही सार्वत्रिक निवडणूक शांततेत आणि व्यवस्थीतपणे पार पाडण्यासाठी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्यावर सोपविलेली निवडणूकीची कामे योग्य समन्वयातून करावी. असे निर्देश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले.
4 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक तयारीचा आढावा निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या बैठकीत घेण्यात आला यावेळी श्री. मोडक बोलत होते. बैठकीला पोलीस अधिक्षक वसंत परदेशी, अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखेडे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी आर.डी. काळे, संदीप महाजन यांचेसह सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा कोषागार अधिकारी चंद्रकांत खारोडे, जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री. राठोड, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक अतुल कानडे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक प्रशांत जाधव व लेखाधिकारी एम.टी. इंगोले यांची उपस्थिती होती.
श्री. मोडक म्हणाले की, निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर एक टोल फ्री क्रमांक असावा. कंट्रोल रुम असावी. आचार संहितेबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्यास त्या तक्रारींची वेळीच दखल घेवून त्या तातडीने निकाली काढाव्यात. निवडणूक प्रक्रीयेवर लक्ष ठेवण्यासाठी व्हिडीओग्राफी सर्व्हेलियन्स पथक, भरारी पथक, चेक पोस्ट पथक, व्हिडीओ शुटींग पथक गठीत करावेत. ही पथके 24 तास कार्यान्वीत ठेवावीत. आवश्यक तेवढी मतदान पथके असावीत. काही पथके राखीव असावीत. क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या निवडणूकीसाठी नियुक्त्या कराव्यात. ज्याठिकाणी मतदान होणार आहे ते सर्व मतदान केंद्र सुस्थितीत असावीत. मतदानासाठी येणाऱ्या मतदारांसाठी मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि दिव्यांग मतदारांसाठी रॅम्सची सुविधा तेथे असावीत. निवडणूकीसाठी आवश्यक तेवढी वाहने अधिग्रहीत करावीत. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर होणाऱ्या सभेला उपविभागीय पोलीस अधिकारी आणि संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना बोलवावे म्हणजे निवडणूकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी पोलीस विभागाची चांगल्याप्रकारे मदत होईल असे त्यांनी सांगीतले. उपजिल्हाधिकारी श्री. काळे यांनी निवडणूकीसाठी करण्यात आलेल्या तयारीची यावेळी माहिती दिली.
जिल्हयातील सहाही पंचायत समितीअंतर्गत जिल्हा परिषद निवडणूकीसाठी 52 गट आणि पंचायत समितीच्या 104 गणांसाठी ही सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. जिल्हयातील 852 मतदान केंद्रावर 7 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणूकीत 3 लाख 54 हजार 720 स्त्री मतदार, 3 लाख 90 हजार 848 पुरुष आणि 9 तृतियपंथी मतदार असे एकूण 7 लाख 45 हजार 577 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. जिल्हयातील 852 मतदान केंद्रावर 852 मतदान पथके मतदान प्रक्रीया पार पाडणार आहे. 135 मतदान पथके ही राखीव असणार आहे. मतदान प्रक्रीया पार पाडण्यासाठी 987 मतदान केंद्राध्यक्ष, 3168 मतदान कर्मचारी आणि 911 शिपाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 852 मतदान केंद्र सुस्थितीत असून यामध्ये 87 आदर्श मतदान केंद्र असणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या सार्वत्रिक निवडणूकीत मतदान यंत्रावर मतदान होणार असून यासाठी 2240 बॅलेट युनिट, 1120 कंट्रोल युनिट आणि 1120 मेमरी लागणार आहे.
उमेदवारांना नामनिर्देशन पत्र घेण्याचे ठिकाणी तालुकानिहाय पुढीलप्रमाणे कारंजा तालुका- उपविभागीय अधिकारी कार्यालय कारंजा, मानोरा तालुका- तहसिल कार्यालय मानोरा, मंगरुळपीर तालुका- उपविभागीय अधिकारी कार्यालय मंगरुळपीर, मालेगांव तालुका- तहसिल कार्यालय मालेगांव, रिसोड तालुका- तहसिल कार्यालय रिसोड आणि वाशिम तालुका- तहसिल कार्यालय वाशिम असे आहे. उमेदवारांना निवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्र व घोषणापत्र संबंधित तहसिल कार्यालय याठिकाणी भरावे लागणार आहे. 8 जानेवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीचे ठिकाण तालुकानिहाय पुढीलप्रमाणे कारंजा तालुका- शासकिय धान्य गोदाम कारंजा, मानोरा तालुका- औद्योगिक प्रशिक्षण संस्था मानोरा, मंगरुळपीर तालुका- शासकीय धान्य गोदाम मंगरुळपीर, मालेगांव तालुका- तहसिल कार्यालय मालेगांव, रिसोड तालुका- उत्तमचंद बगडिया कला व वाणिज्य महाविद्यालय रिसोड आणि वाशिम तालुका- शासकीय तंत्रनिकेतन वाशिम येथे होणार आहे.





