नागपूर,दि.16: राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची सुरुवात आज देशाचे नवे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अभिनंदनपर प्रस्तावाने झाली. नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही विधीमंडळाच्या अधिवेशनातले हे पहिलेच भाषण होते. या भाषणात उद्धव ठाकरे यांनी उच्चारलेल्या एका शब्दाने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.
शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस महाआघाडीच्या सरकारचे हे पहिलेच अधिवेशन आहे. विधानसभेचे कामकाज सुरू होताच न्यायमूर्ती शरद बोबडे यांची देशाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्यात झाला. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण झाले. मुख्यमंत्र्यांनी बोबडे यांच्या आजवरच्या कार्याचे कौतुक करताना त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ‘एक मराठी व्यक्ती सर्वोच्च पदी बसतो आहे, ही बाब अभिमान ऊर भरून येणारी आहे. त्यातही मूळचे नागपूरचे असलेल्या बोबडे यांचा सत्कार नागपूर अधिवेशनात होतो आहे हाही एक दुर्मिळ योगायोग आहे, असे ते म्हणाले.
त्यापुर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकप्रस्ताव मांडला. त्यावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सदस्य सर्वश्री अजित पवार, बबनराव पाचपुते, डॉ.पंकज भोयर, अॅड. अशोक पवार यांनी शोकभावना व्यक्त केल्या.
उद्धव ठाकरे यांनी बोबडेंना खास शैलीत शुभेच्छा दिल्या. त्यावेळी त्यांनी उच्चारलेल्या एका शब्दावर सभागृहाने कान टवकारले. ‘आता शरद ऋतू सुरू झालाय. शरद ऋतूत नवी निर्मिती होत असते. नवचैतन्य येत असते, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे आता ते राजकीय काही बोलतात की काय, अशी उत्सुकता निर्माण झाली. मात्र, मुख्यमंत्री शिताफीने मूळ विषयावर आले. ‘अत्यंत कष्ट आणि संघर्षातून बोबडे यांनी आजची उंची गाठली आहे. सरन्यायाधीश म्हणून ते न्यायव्यवस्थेत नवचैतन्य आणतील. रामशास्त्रींच्या बाण्यानेच न्यायदान करतील, अशी आम्हाला खात्री आहे,’ असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. ‘शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बोबडे यांनी प्रयत्न केले आहेत. यापुढेही ते अन्नदात्याला न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहतील,’ असा विश्वासही उद्धव यांनी व्यक्त केला.राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारी चहापानावर बहिष्कार टाकून विरोधकांनी आक्रमकतेची चुणूक दाखवली होती. त्यानुसार आज भाजपचे आमदार ‘मी सावरकर’ असे लिहिलेल्या टोप्या घालूनच विधान भवनात आले होते. कामकाज सुरू होण्याआधी त्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने करून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या धिक्काराच्या घोषणा दिल्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील स्वत: फलक घेऊन पायऱ्यांवर उभे होते. भाजपचा हा आक्रमक पवित्रा पाहता हिवाळी अधिवेशन गाजण्याची चिन्हे आहेत.





