गोंदिया,दि.27ः- महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण मंडळाच्या संचालकाच्या बैठकीत रामनगर, गोंदिया शहर आणि रावणवाडी पोलीस स्टेशनसह मनोहर चौकातील पोलीस लाईनमध्ये १४0 पोलीस सदानिका बांधकामाकरिता १0६ कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यापैकी ५७ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून तीन पोलिस स्टेशनच्या इमारत व पोलीस कॉटरच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे.
माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी शासनाकडे पाठपुरावा करून हा निधी मंजूर करुन घेतला होता. मात्र याला मंजुरी मिळाल्यानंतर निवडणूक आचारसंहितेमुळे बांधकाम थांबले होते. विधानसभा निवडणुका संपल्यानंतर अग्रवाल यांनी पुन्हा शासनाकडे पाठपुरावा करून शहर, रामनगर व रावणवाडी पोलीस स्टेशनच्या इमारतीचे बांधकाम सुरू केले. वर्षभरात या तीनही पोलीस स्टेशनचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे रावणवाडी येथील पोलीस स्टेशन हे भाड्याच्या इमारतीत सुरु आहे. अग्रवाल यांनी पोलीस स्टेशन इमारत बांधकामासाठी जागा सुद्धा उपलब्ध करून दिली होती. तर मनोहर चौक परिसरात पोलीस वसाहतीसाठी बांधकामाला मंजुरी मिळवून घेतली. सध्या वसाहत बांधकामाला सुरुवात झाली असून, अनेक पोलीस कर्मचार्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे.





