भंडारा, दि.28 :केंद्र आणि राज्य शासनाच्या कृषीशी संबंधित योजना या शेतकर्यांना आणि पर्यायाने ग्रामीण अर्थव्यवस्थेला सुदृढ करणार्या असतात. त्या लोकांपर्यंत पोहचविण्याचे यंत्रणा म्हणून आपले आहे. बरेचदा योजनांची अंमलबजावणी होत असल्याचे कागदावर दिसते. परंतु, योजनांच्या माध्यमातून झालेल्या कामांचे मुल्यमापन होणेही तेवढेच गरजेचे आहे. असे झाल्यास खर्या अर्थाने लाभ दिल्याचे समाधान आपल्याला मिळू शकेल, असे मत भंडारा गोंदियाचे खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केले.
भंडारा गोंदिया जिल्ह्यातील कृषी विभागाच्या मागील दोन वर्षातील कामाचा आढावा घेण्याच्या दृष्टीने एका बैठकीचे आयोजन भंडारा येथे करण्यात आले होते. कृषी विभागाचे सहायक कृषी संचालक भोसले, दोन्ही जिल्ह्याच्या अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, सेवानवृत्त कृषी अधिकारी तायडे, प्रयोगशील शेतकरी संजय एकापूरे, सुधीर धकाते, राजेश गायधने व अन्य अधिकारी उपस्थित होते.
केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या सर्व कृषीशी संबंधित योजनांचा आढावा यावेळी खासदारांनी घेतला. दोन्ही आर्थिक वर्षात आलेल्या योजना आणि त्याची झालेली अंमलबजावणी या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यात आली. फळबाग, पीक प्रात्याक्षिक, अन्न सुरक्षा, कृषी निविष्ठा वितरण अशा योजनांची माहिती घेतानाच रासायनिक खतांच्या पुरवठाचा आढावा खासदारांनी घेतला. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत केल्या जाणार्या कृषी विषयक कामांची माहिती जाणून घेण्यात आली. अवकाळी पावसाने झालेले नुकसान, शेतकर्यांची संख्या आणि प्रत्यक्ष मदत मिळालेल्या शेतकर्यांची आकडेवारी जाणून घेताना ज्यांना मदत पोहोचली नाही, त्याच्या कारणांशी मिमांसा करून तत्काळ मदत मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत, असे निर्देशही खासदारांनी यावेळी दिले.
कृषी सहसंचालक जाधव यांनी यावेळी विविध प्रकारची माहिती खासदारांना दिली. इतरही अनेक विषयांवर खा. मेंढे यांनी संबंधितांना महत्वाच्या सूचना या बैठकीच्या निमित्ताने केल्या





