गडचिरोली,दि.28ः– धानोरा उपविभागांतर्गत येत असलेल्या पोलीस मदत केंद्र कटेझरी हद्दीतील अतिदुर्गम, अतिसंवेदनशील मानल्या जाणार्या गरेकसा येथील महिलांना पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागत होती. ही बाब गडचिरोली पोलीस दलाच्या कटेझरी येथील प्रभारी अधिकारी व जवानांना लक्षात आल्यानंतर त्यांनी महिलांची पायपीट थांबविण्यासाठी अभिनव उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गावाच्या बाहेर असलेल्या विहीरीवर सबर्मसिबल पंप बसवून पाईपलाईनद्वारे अतिदुर्गम भागातील गुरेकसा येथील महिलांची पाण्यासाठीची पायपीट थांबली.
जिल्हा परिषद शाळा, गरेकसा येथील बोअरवेल नादुरुस्त असल्याने येथे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या. सदर नादुरुस्त बोअरवेल गडचिरोली पोलीस दलाने दुरुस्त केल्याने बोअरवेलच्या माध्यमातुन या शाळेत पाणी पुरवठा सुरळीत सुरु झाला. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर हास्य फुलले.
गरेकसा येथील महिलांनी दारात नळाद्वारे आलेले पाणी पाहून खुपच आनंदी झाले व शाळेत आलेले पाणी पाहून ग्रामस्थांच्या आनंदाला पारावार उरला नाही. काही दिवसांपूर्वीच पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी कटेझरी येथील महिलांची पाण्यासाठीची पायपीट थांबविली. कटेझरी येथील घरापर्यत पाणी पोहचविण्याची व्यवस्था केली होती. आज पुन्हा एकदा गरेकसा येथील महिलांचे पाण्यासाठीचे अर्शू पुसण्याचे काम केल्याने येथील जनतेने गडचिरोली पोलीस दलाचे आभार मानले आहेत.
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोमके कटेझरी येथील प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अक्षयकुमार गोरड व कर्मचारी यांचे अभिनंदन केले.





