गोंदिया,दि.15ः- गोंदिया जिल्ह्यातील वनवैभवात विविध पक्ष्यांसह प्राण्यांची मोठ्याप्रमाणात संख्या आहे.त्यातच फुलपाखरांच्या तर अनेक प्रजारी या जिल्ह्यातील नागझिरा नवेगाव व्याघ्रप्रकल्पाच्या भागात बघावयास मिळतात.त्यातच आता अर्जुनी मोरगाव तालुक्यात असलेल्या नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान परिसरात दुर्मिळ असलेले पांढर्या रंगाचे सांभर आढळून आल्याने वन्यजिव विभागासह वनविभागात व वन्यप्रेमीमध्ये कुतूहलाचा विषय निर्माण झालेला आहे.
जिल्ह्यातील नवेगाव बांध नागझिरा व्याघ्र राखीव मधील नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानात दुर्मिळ अल्बिनो पांढऱ्या रगांचे सांभर आढळून आले आहे. वनरक्षक हितेंद्र अनारसे हे दररोजप्रमाणे राष्ट्रीय उद्यानात फिरत असतांना यापुर्वी कधीही बघावयास न आलेले प्राणी गवतात बसून असल्याचे दिसताच अचभिंत झाले.आणि लगेच त्यांनी त्या प्राण्याचे छायाचित्र आपल्या मोबाईलमध्ये क्लिक करुन वरिष्ठांना माहिती दिली.यापुर्वी 2017 मध्ये गुजरातमधील गीर मध्ये असेच अल्बिनो सांभर आढळल्याची नोंद आहे. या पांढऱ्या सांभराचा कानाचा रंग हलका गुलाबी, पिंगट डोळे व तृण आच्छादित भूपृष्ठावर उठून दिसणारा असल्याची माहिती नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालिका पुनम पाटे यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले.
अंगातील मेलेनीन कमी असल्यामुळे किंवा नसल्यामुळे डीएनएत बदल होऊन अल्बिनो तयार होऊन रंग पाढंरा येतो.अल्बिनो प्राण्यात शरीरातील रंगद्रव्य कमी असते वा बिलकुल नसते व त्यामुळे कातडीचा रंग पांढरा,केस भुरकट असतात अशा प्राण्यात दृष्टीदोष असतो अशी माहिती सेवानिवृत्त वनाधिकारी अशोक खुणे यांनी बेरार टाईम्सशी बोलतांना सांगितले.





