गोंदिया,दि.17 : इयत्ता पहिली ते दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या इतर मागासवर्ग व विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन 2019-20 पासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना नव्याने सुरु करण्यात आलेली आहे. ही शिष्यवृत्ती ऑफलाईन स्वरुपाची झालेली असून या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी व सर्व पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती (सर्व) यांची बैठक 3 जानेवारी रोजी आयोजित केली होती. या बैठकीत प्रत्येक पंचायत समिती स्तरावर येणाऱ्या सर्व गट संसाधन केंद्रात शिबिराचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले असून त्यानुसार खालीलप्रमाणे निश्चित केलेल्या तारखेला गट संसाधन केंद्रामध्ये सर्व शाळांनी कार्यालयीन वेळेत हार्ड व सॉफ्ट कॉपी (पेन ड्राईव्ह)मध्ये परिपूर्ण प्रस्ताव सादर करावयाचे आहे.
गट संसाधन केंद्र गोंदिया येथे 3 व 4 फेब्रुवारी 2020 रोजी, गोरेगाव- 5 फेब्रुवारी, सडक/अर्जुनी- 6 फेब्रुवारी, अर्जुनी/मोरगाव- 7 फेब्रुवारी, देवरी- 10 फेब्रुवारी, सालेकसा- 11 फेब्रुवारी, आमगाव- 12 फेब्रुवारी व गट संसाधन केंद्र तिरोडा येथे 13 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.ज्या शाळांचे प्रस्ताव विहीत वेळेत प्राप्त होणार नाही व यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास संबंधित मुख्याध्यापकास सर्वस्वी जवाबदार धरण्यात येईल याची नोंद घ्यावी. प्रस्ताव सादर करतांना सर्व मुख्याध्यापकांनी प्रस्तावासोबत यापूर्वी दिलेले प्रमाणपत्र विहीत नमुन्यातच सादर करावे. असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद गोंदिया यांनी कळविले आहे.




