मुंबई,दि.17ः-जनतेने उद्याच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी इंधनाचा काटकसरीने वापर करून पर्यावरण संवर्धनाच्या राष्ट्रीय मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. पेट्रोलियम पदार्थाच्या संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटनेद्वारे आयोजित सक्षम अभियान २0२0(संरक्षण क्षमता महोत्सव) कार्यक्रमाचे उद््घाटन भुजबळ यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते.
विकासाकडे वेगाने वाटचाल करणार्या आपल्या देशाची व राज्याची ऊर्जेची वाढती गरज भागविण्यासाठी पेट्रोलियम पदार्थाच्या आयातीवर अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीत ऊर्जा साधनांचा काटकसरीने वापर देशाच्या व राज्याच्या शाश्वत विकासासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वाचे पाऊल ठरते. राज्य सरकार पेट्रोलियम पदार्थांना पर्याय म्हणून अपारंपरिक ऊर्जेचा व इतर साधनांचा वापर करण्यासाठी उपाययोजना करीत आहेत.
सक्षम अभियान २0२0, इंधन अधिक ना खपाएं, आओ पर्यावरण बचाए हे घोषवाक्य प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक आहे. या अभियानांतर्गत होणार्या विविध कार्यक्रमांचा यासाठी निश्चितच उपयोग होईल. पीसीआरए संघटनेच्या सक्षम अभियान २0२0अभियानाला भुजबळ यांनी शुभेच्छा दिल्या. सक्षम अभियान २0२0(संरक्षण क्षमता महोत्सव) हे अभियान १५ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असून या अभियानाचे इंधन अधिक ना खपाएं, आओ पर्यावरण बचाए हे घोषवाक्य आहे. यावेळी भुजबळ यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावरील दुसरा उत्कृष्ट राज्य परिवहन संस्था पुरस्कार बेस्टचे मुख्य प्रबंधक लाड यांना आणि बेस्टच्या बांद्रा डेपोला उत्कृष्ट डेपो पुरस्कार देण्यात आला. राज्यस्तरावरील उत्कृष्ट परिवहन पुरस्कार मुरुड (रायगड), पंचवटी (नाशिक), यवतमाळ, श्रीवर्धन (रायगड), पेण (रायगड), परभणी, पीएमपीएमएल पुणेच्या बालेवाडी या डेपोंना उत्कृष्ट डेपो पुरस्कार देण्यात आले. भुजबळ यांच्या हस्ते पीसीआरएच्या सक्षम-संरक्षण क्षमता महोत्सव या व्हॅनचेही उद््घाटन करण्यात आले.





