32.7 C
Gondiā
Friday, June 26, 2026
Home गुन्हेवार्ता भंडारा जिल्हा परिषद भरती प्रक्रिया रद्द, आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

भंडारा जिल्हा परिषद भरती प्रक्रिया रद्द, आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

0
19

भंडारा(विशेष प्रतिनिधी)दि.१७ः- भंडारा जिल्हा निवड समितीमार्फत अनुसूचित जमाती प्रवर्गातील तीन जागांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत मोठा घोळ झाल्याचे समोर आल्याने जिल्हाधिकारी एम.जे. प्रदिपचंद्रन यांनी भरती प्रक्रि या रद्द केली आहे. ही परीक्षा घेणार्‍या एजंसीचे चार ऑपरेटर व चार परिक्षार्थ्यांविरुद्ध भंडारा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी एम.जे. प्रदिपचंद्रन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.भंडारा येथे परीक्षा घेणार्‍या एएसबी सिस्टीम या कंपनीने वर्धा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली येथेही परीक्षा घेतल्या आहेत. त्यामुळे असाच प्रकार त्या जिल्ह्यांमध्येही झाल्याचा अंदाज असल्याने जिल्हाधिकारी एम.जे. प्रदिपचंद्रन यांनी चंद्रपूर व गडचिरोली जिल्हाधिकार्‍यांना याबाबत कळविले असून उत्तरपत्रिकांची पुन्हा तपासणी करण्यास सांगितले आहे. याशिवाय एएसबी सिस्टिम या कंपनीला ब्लॅक लिस्टेट केले आहे.
भंडारा जिल्हा परिषदेत अनुसूचित जमाती प्रवर्गातील ज्या कर्मचार्‍यांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नाही, अशांची सेवा समाप्त करुन त्यांच्या जागी नवीन पदभरती प्रक्रि या राबविण्यात आली. त्यानुसार, अंगणवाडी पर्यवेक्षिकेच्या २ जागांसाठी आणि कनिष्ठ अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा या एका जागेसाठी जाहीरात प्रकाशित करण्यात आली होती. त्यानुसार, १२ जानेवारी रोजी परिक्षा घेण्यात आली. अंगणवाडी पर्यवेक्षिका पदासाठी ३४१ व कनिष्ठ अभियंता पदासाठी १२१ परिक्षार्थ्यांनी परिक्षा दिली. १३ जानेवारीपर्यंत आक्षेप नोंदवायचे होते. आणि त्यानंतर निकाल घोषित करायचा होता. सदर परिक्षेचे निकाल जाहीर झाल्यानंतर चार परिक्षार्थ्यांना अपेक्षेपेक्षा जास्त गुण प्राप्त झाल्याचे लक्षात आले. जिल्हाधिकारी एम.जे. प्रदिपचंद्रन यांनी स्वत: प्रश्नपत्रिकेची रचना केली होती. तसेच एकूण २00 गुणांपैकी कुणीही १५0 च्यावर गुण घेणार नाही, असे प्रश्न विचारण्यात आले होते. तरीसुद्धा काही परिक्षार्थ्यांना २00 पैकी १९0, १८६, १७८ असे अनपेक्षित गुण मिळाले. हा प्रकार जिल्हाधिकार्‍यांना शंकास्पद वाटल्याने त्यांनी ओएमआर मशिनद्वारे उत्तरपत्रिका तपासतानाचे सीसीटीव्हीची पाहणी केली. त्यावेळी उत्तरपत्रिका तपासणार्‍या एएसबी सिस्टीम, मुंबई या एजन्सीचे ऑपरेटर उत्तरपत्रिकेची अदलाबदल करताना आढळून आले.
जिल्हाधिकार्‍यांनी त्या उत्तरपत्रिकांची तपासणी केली असता परीक्षा अधिकार्‍याच्या स्वाक्षरीमध्ये तसेच शाहीमध्ये तफावत लक्षात आली. परीक्षा अधिकार्‍यांनीही त्या उत्तरपत्रिकेवरील स्वाक्षरी आपली नसल्याचे सांगितले. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी सर्वाधिक गुण प्राप्त करणार्‍या परीक्षार्थ्यांना आपल्या कक्षात बोलाविले. जे प्रश्न परिक्षेत विचारण्यात आले होते त्याच प्रश्नांचे उत्तर त्यांना तोंडी विचारण्यात आले. परंतु, एकही परिक्षार्थी व्यवस्थित उत्तर देऊ शकला नाही. ज्याला इंग्रजीमध्ये पैकीच्या पैकी मिळाले, त्याला इंग्रजीतील एक वाक्यही धड बोलता येत नसल्याचे समोर आले. मशिनमध्ये उत्तर पत्रिका तपासणार्‍या ऑपरेटरने उत्तरपत्रिका बदलवून हा घोळ केल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशान्वये जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर यांनी बुधवारी रात्री भंडारा पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्र ारीवरुन पोलिसांनी एएसबी सिस्टीम, मुंबई या एजंसीचे ऑपरेटर सागर उंबरकर, पवार, शुभम राऊत व अन्य एकासह चार परीक्षार्थ्यांविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत. हे चार परिक्षार्थी भंडारा, ब्रम्हपुरी, वर्धा व गडचिरोली येथील आहेत. ही परिक्षा रद्द करुन फेब्रुवारी महिन्यात दुसर्‍यांदा परिक्षा घेतली जाणार आहे.