आमगाव,दि.17ः-बौद्ध धर्म हा जातीवर आधारित भेदभाव करीत नसून संपूर्ण मानवजातीमध्ये बंधुभाव व प्रेम निर्माण करतो. त्यामुळे प्रत्येक भारतीयाला बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानाची माहिती असायला हवी, असे मत माजीमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.
ते आमगाव (धम्मगिरी) येथे आयोजित आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म संमेलन कार्यक्रमप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. या प्रसंगी आ. सहसराम कोरेटी, आ.मनोहर चंद्रिकापुरे, माजी आ. दिलीप बन्सोड, माजी जिप अध्यक्ष विजय शिवणकर, उषाताई मेंढे, जिप सभापती विश्वजीत डोंगरे, नरेश माहेश्वरी, सुरेश हर्षे, सिंधूताई भुते, छबूताई उके, रमन डेकाटे आदी मान्यवर व जिल्हातील आंबेडकरी समाज उपस्थित होते. बडोले पुढे म्हणाले, बौद्ध धमार्ची शिकवण ही सत्य व आचरणावर अवलंबून आहे. गौतम बुद्धांनी दिलेल्या तत्वज्ञानाचा स्विकार केला जात असून तेच तत्वज्ञान आज जगाला शांती देत आहे. भारतातील नालंदा विद्यापीठात बौद्ध धमार्सोबतच अन्य धर्मावरही खूप सखोल चर्चा केली जात असून याच विद्यापीठातून बौद्ध धमार्चा प्रसार आणि प्रचार झाला. म्हणूनच भारतात निर्माण झालेल्या या धर्माच्या तत्वज्ञानाची प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी आमगाव तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आले.





