33.9 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home क्रीडा मुंबई मॅराथॉनमध्ये गोंदियाच्या धावपटूंचा वर्चस्व

मुंबई मॅराथॉनमध्ये गोंदियाच्या धावपटूंचा वर्चस्व

0
31

गोंदिया,दि.22ः मुंबई येथे पार पड़लेल्या १0 व २१ किमी मॅराथॉन स्पर्धेत सहभागी झालेल्या ५५ हजार धावपटूंना मागे टाकत आदिवासीबहूल व नक्षलदृष्ट्या संवेदनशील असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील ८ धावपटूंनी उत्कृष्ट टाइमिंगसह ‘टॉप टेन’मध्ये स्थान मिळविल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. रविवार, १९ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गॅनफायर करुन मॅराथॉनचा शुभारंभ केला. यावेळी धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी अभिनेता टायगर र्शाफ, राहूल बोस, गीतकार गुलजार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मॅराथॉनच्या १0 किमी ड्रीम दौड स्पर्धेच्या २५ ते ३0 वयोगटात जिल्ह्यातील रावणवाडी येथील सुभाष लिल्हारे याने (३५.0४ मिनीट) प्रथम क्रमांक व ओव्हर ऑल स्पर्धेत द्वितीय स्थान प्राप्त केले. याच गटात अमोल चचाणे याने तृतीय स्थान पटकाविले. १८ ते २४ वयोगटात बागडबंधचा संदीप चौधरी याने (३५.५७) द्वितीय, १0 ते २0 वयोगटात कोसमतरार्ची वर्षा पंधरे हिने (४५.२३) तृतीय, बाजारटोला येथील वैशाली माटे तृतीय व चिरचाळबांधची सीमा टेंभरे हिने चौथा क्रमांक पटकाविला. २१ किमी मॅराथॉमध्ये जिल्ह्यातील रजेगाव येथील गुरुदेव दमाहे याने सहावा तर दिनेश दाऊदसरे याने सातवे स्थान पटकाविले. या धावपटूंनी आपल्या यशाचे श्रेय पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, मुंबई पोलीस आयुक्त हरीश बैजल, नक्षल सेलचे बघेले यांना दिले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातंर्गत कार्यरत नक्षल प्रोपोगंडा सेलद्वारे आदिवासी युवकांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यातील उत्कृष्ट खेळाडूंना प्रशिक्षण देऊन मोठ्या स्पर्धेकरिता तयार केले जाते. यातील १0 धावपटूंची मुंबई मॅराथॉनसाठी निवड करुन त्यांना नक्षल सेलचे पोलीस उपनिरीक्षक बघेले यांनी  पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्यासह मुंबईचे पोलीस उपायुक्त हरीश बैजल यांच्यामार्गदर्शनात मॅराथॉनची तयारी केली होती. दरम्यान, बैजल यांनी सर्व धावपटूंच्या मॅराथॉन प्रवेश प्रक्रियेसह त्यांच्या राहण्याची व्यवस्था अंधेरी स्थित मोरल पीटीएसमध्ये केली. पोलीस अधिकारी किरण राठोड व रिना चव्हाण यांच्यासह सर्व धावपटूनी आपली गुणवत्ता सिद्ध करीत मुंबईत गोंदियाचे नाव उंचावले आहे.