गडचिरोली,दि.23:- कुष्ठांतेय (कुष्ठरोग) व क्षयरोग आजाराबाबत जिल्हयात दि. 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2020 दरम्यान ‘स्पर्श’ कुष्ठरोग व क्षयरोग जनजागृती अभियान राबविले जाणार आहे. याबाबत जिल्हास्तरावर जिल्हा समन्वय सभेच्या बैठकित नियोजन करण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर जिल्हा श्ल्य चिकीत्सक डॉ.अनिल रूढे जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ जिल्हा क्षयरोग अधिकारी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी, विनोद मशाखेत्री उपस्थित होते.
जिल्हयातील कुष्ठांतेय पी. आर. ( व्याप्ती दर ) हा दहा हजार लोकसंख्येमागे 6.74 इतका आहे. राज्यात सर्वात जास्त व्याप्ती दर असणार गडचिरोली जिल्हा आहे. याबरोबरच शेजारील चंद्रपूर-वर्धा येथेही हा दर मोठया प्रमाणात आढळून आला आहे. त्यामुळे लोकांमध्ये या आजाराबाबत जनजागृती व्हावी या हेतूने अभियान जिल्हयात राबविण्यात येणार आहे. या अभियानातून कुष्ठरोग आजाराबाबत असलेल्या चूकीच्या समजूती दूर करणे, लोकांनी वेळीच तपासण्या करुन पुष्टी करुन घेणे, आजारी लोकांना वेळेत औषधोपचार करणे याबाबत माहिती दिली. जाणार आहे. जिल्हयातील व्याप्ती दर 6.74 वरुन एकच्या आत आणणे प्रशासनाचे उद्रिदष्ट आहे. यासाठी प्रत्येक संशयीत व्यक्तिने आपली तपासणी करण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे.
स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत या वर्षी ” कुष्ठरोगाविरुध्द अखेरचे युध्द ” हे घोषवाक्य ठरविण्यात आले आहे. गावपातळीवर या कालावधीत विविध समाजप्रबोधन केले जाणार आहे. या आजाराबाबत काही लक्षणे असल्यास ग्रामस्थांनी त्याबाबतची माहिती आरोग्य कर्मचारी आणि आशाला कळवावी असे जिल्हा आरोग्य विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे. अभियान काळात प्राथमिक लक्षणे, उपचार याबाबतची माहिती दिली जाणार आहे. जिल्हास्तर, तालुकास्तर व गावस्तर या तीन विभागास्तरावर विविध कार्यशाळा जनजागृती कार्यक्रमांच आयोजनही केले जाणार आहे.
चौकट-1:- शासनकडून कुष्ठरोग या शब्दाऐवजी ‘ कुष्ठांतेय ‘ शष्दप्रयोग करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याचा अर्थ कुष्ठरोगावर विजय मिळवणारा ‘ कुष्ठांतेय ‘ असा आहे. कृष्ठरोग औषधोपचारानंतर बरा होतो. मुळात या रोगाचे लक्षणे दिसल्यानंतर न लाजता किंवा न घाबरता लोकांनी आपली तपासणी करुन घेणे गरजेचे आहे. याबाबत असणाऱ्या चुकीच्या समजुती दूर करुन समुळ या रोगाचे उच्छाटन करणे गरजेचे आहे.
चौकट-2:- जिल्हयातील कुष्ठरोगाचा तालुकानिहाय व्याप्ती दर ( दर दहा हजार लोकसंख्ये मागे ) अहेरी – 4.95, आरमोरी – 8.85 , भामरागड – 4.45 , चामोर्शी – 7.26, धानोरा- 3.43 , ऐटापल्ली – 2.82 , गडचिरोली – 10.29 , कुरखेडा – 4.46 , मुलचेरा – 5.23 , सिरोंचा – 7.04 व वडसा – 11.53 ,
चौकट- 3:- 26 जानेवारी रोजी जिल्हयातील प्रत्येक ग्रामपंचायती मध्ये ग्रामसभेत याबाबत चर्चा केली जाणार आहे. जिल्हाधिकारी यांनी केलेले लेखी आवाहन यावेळी सर्व ग्रामस्थांना वाचून दाखविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांनी कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत घ्यावयाची काळजी याबाबत जिल्हाधिकारी यांनी ग्रामस्थांना कडून कुष्ठरोग व क्षयरोग बाबत नियंत्रण करणेसाठी प्रतिज्ञा घेतली जाणार आहे.




