गडचिरोली दि.23: जिल्हयात शाळा, विद्यालय, आश्रमशाळा, वसतीगृह इत्यादी ठिकाणी २७० जनजागृती कार्यक्रम घेवून ३७ हजार मुली तथा मुलांपर्यंत चाईल्ड लाईन १०९८ बाबत चाईल्ड लाईन इंडिया फौडेशन मुंबई तथा जिल्हा प्रशासन गडचिरोली यांच्या सहकार्याने माहिती पोहचविण्यात आली. यात चाईल्ड लाईन १०९८ म्हणजे काय? चाईल्ड लाईनचे उद्देश आणि कार्य काय याबाबत माहिती देणेत आली. तसेच चाईल्ड लाईन १०९८ या राष्ट्रीय टोल फ्री क्रमांकाचा वापर केव्हा आणि कसा करावा तसेच बालकां संदार्भातील त्यांचे संरक्षणार्थ तयार झालेले कायदे त्यांचे हक्क व अधिकार याबाबत माहिती दिली गेली. समाजातील जाचक अनिष्ट रूढी तथा परंपरा तद्वतच समाजातील बाल्कासंदार्भातील तीव्र समस्या, बाल लैंगिक शोषण, बाल मजुरी, बाल विवाह, बालकांना बळजबरीने भिक मागण्यास प्रवृत्त करणे, बालकांचे अपहरण, घरातून पळून गेलेली व हरवलेली बालके इत्यादी समस्या वरती चाईल्ड लाईन इंडिया फौडेशन मुंबई द्वारा निर्मित राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त लघुपट, मार्गदर्शन शिविरे, तथा खेळाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्ह्यातील बारा तालुक्यातील २१९ गावात चाईल्ड लाईन १०९८ गडचिरोलीच्या टीमने चाईल्ड लाईन गडचिरोलीचे जिल्हा प्रकल्प समन्वयक दिनेश बोरकुटे यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमांचे आयोजन केले. जनसामान्य लोकांमध्ये जनजागृती करून जिल्ह्याच्या / समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत चाईल्ड लाईन १०९८ या राष्ट्रीय टोल फ्री क्रमांकाबाबतची माहिती दिली. बालकांच्या संरक्षणार्थ असणारे कायदे यात बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम-२०१५ तथा बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम-२०१२ तसेच बालविवाह प्रतिबंधक कायदा, बाबत ची माहिती पोहचविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. जिल्ह्यात चाईल्ड लाईन १०९८ ला प्राप्त तक्रारी बाल लैंगिक शोषण, बालमजुरी, भिक्षेकरी बालके, शैक्षणिक समस्या उद्भवलेली बालके, मानसिक रुग्ण असलेले बालके,अनाथ बालक तसेच काळजी आणि संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांना जिल्हा बाल कल्याण समिती गडचिरोली तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली, पोलीस प्रशासन गडचिरोली यांच्या मार्गदर्शनात न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.
जिल्हयात माहे एप्रिल २०१९ पासून चाईल्ड लाईन १०९८ ची सुरवात झाली. या १० महिन्यात चाईल्ड लाईन गडचिरोली च्या माध्यमातून आम्ही आमच्या आरोग्यासाठी, कुरखेडा चे संयोजक तथा परियोजना संचालक डॉ सतीश गोगुलवार तसेच परियोजना सल्लागार शुभदा देशमुख, आणि चाईल्ड लाईन इंडिया फौंडेशन, मुंबईचे वरिष्ठ कार्यक्रम समन्वयक अमित सोनावले, जिल्हा प्रकल्प समन्वयक दिनेश बोरकुटे, यामिनी चुधरी, मोनिका वासनिक, पंकज कोडाप, दिनेश जुळा, आकाश मडावी, बंडू रायसिडाम यांनी मार्गदर्शन व कार्य केले. उपक्रमाचा लक्षगट असलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळा, विद्यालय, महाविद्यालय, आश्रमशाळा, वसतिगृह, इतर ठिकाणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली, बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली, शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली, समाज कल्याण विभाग गडचिरोली यांच्या सहकार्याने आजपावेतो शाळा, विद्यालय, आश्रमशाळा, वसतिगृह इत्यादी ठिकाणी २७० जनजागृती कार्यक्रम घेवून ३७ हजार मुली तथा मुलांपर्यंत चाईल्ड लाईन १०९८ बाबत माहिती पोहचविण्यात आली.




