30.2 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home शैक्षणिक अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इग्रजी माध्यमांच्या शाळेत शिक्षणाची सुविधा

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इग्रजी माध्यमांच्या शाळेत शिक्षणाची सुविधा

0
22

वाशिम, दि. ३० : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील  अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिली, दुसरीमध्ये प्रवेश देण्यात येतो. या शाळांमध्ये सन २०२०-२१ मध्ये इयत्ता पहिली, दुसरीमध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्या कार्यालयात हे प्रवेश अर्ज विनामुल्य उपलब्ध आहेत. पालकांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता व कोणाच्याही माध्यमातून प्रवेश अर्ज प्राप्त करून न घेता थेट कार्यालयाशी संपर्क साधून प्रवेश अर्ज प्राप्त करून घ्यावा व १५ फेब्रुवारी २०२० पर्यंत प्रवेश अर्ज सादर करावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी आर. बी. हिवाळे यांनी केले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याच्या नावे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत पालकांनी सादर करावी. तसेच प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्याच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा १ लाख रुपये इतकी राहील. इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे वय ६ वर्षे पूर्ण असावे. जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्रामसेवकाने दिलेला दाखला ग्राह्य धरण्यात येईल. विद्यार्थ्याचे पालक शासकीय/निमशासकीय सेवेत नसावेत. याबाबत ग्रामसेवकाने दिलेला दाखला ग्राह्य धरण्यात येईल.

आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांची तसेच विधवा, घटस्फोटीत, निराधार, परितक्त्या व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची प्राधान्याने निवड करण्यात येईल. विद्यार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्यास यादीतील अनुक्रमांक नमूद करावा. योजनेचा लाभ घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याच्या पालकांनी प्रवेश अर्जासोबत संमतीपत्र व दोन पासपोर्ट फोटो जोडावेत. इयत्ता दुसरी प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्याच्या अर्जासोबत शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र जोडावे. तसेच विद्यार्थ्याच्या आधारकार्डची झेरॉक्स प्रत जोडावी. खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द केला जाईल, असे प्रकल्प अधिकारी श्री. हिवाळे यांनी कळविले आहे.