गोंदिया,दि.01 : बाई गंगाबाई महिला व बाल रुग्णालयात 30 जानेवारी 2020 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमीत्त ‘कुष्ठमुक्त भारत’ साध्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्य आयोग्य प्रशासनातर्फे ‘स्पर्श’ हे कुष्ठमुक्त अभियान सुरु करण्यात आले. त्यानिमीत्त बाई गंगाबाई महिला व बाल रुग्णालयात सकाळी 11 वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन व दोन मिनिटे मौन बाळगून प्रभारी अधिक्षीका डॉ.सुवर्णा हुबेकर यांच्या नेतृत्वात श्रध्दांजली अर्पित करण्यात आली.
समाजसेवा अधिक्षीका श्रीमती सुषमा कृपाल व मेट्रन दिप्ती साळवे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. त्यानंतर प्रभारी अधिक्षीका डॉ.सुवर्णा हुबेकर यांनी ‘स्पर्श’ अभियानासाठी गंगाबाई रुग्णालयाच्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांकडून व डॉक्टर्सकडून ‘कुष्ठमुक्त भारत’ संकल्पना राबविण्यासाठी शपथ घेतली व संकल्प केला.
याप्रसंगी अधिक्षीका डॉ.सुवर्णा हुबेकर यांनी ‘स्पर्श’ अभियानाबाबत माहिती देतांना सांगितले की, 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत कुष्ठरोग चिकित्सा मोहीम राबविली जात आहे. त्याअंतर्गत मोफत रोगचिकित्सा व निदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. तरी अंगावर फिक्कट पांढरा चट्टा असल्यास जवळच्या सरकारी दवाखान्यात जावून औषधोपचार करुन घ्यावेत. कुष्ठरोग हा कुठल्याही शापामुळे होत नाही. लेप्रा बॅक्टेरियामुळे होणारा हा आजार असून वैद्यकीय उपचाराने तो पूर्णपणे बरा होते. तरी कुष्ठरोग लपवू नये. यासाठी आरोग्य विभागामार्फत व्यापकपणे जनजागृती करण्यात येत आहे.या अभियानासाठी मेट्रन दिप्ती साळवे, डॉ.अर्चना जाधव, डॉ.धाबेकर, श्रीमती इंदू बोपचे, श्रीमती देशमुख, शेरकुरे, श्रीमती नितू फुले, श्री.वासनिक, श्री.सुर्यवंशी तसेच समाजसेवा अधिक्षीका श्रीमती सुषमा कृपाल, वैशाली भिवसाने व सर्व पॅरॉमेडीकल स्टाफ परिश्रम घेत आहेत.




